'कॅन्सर रुग्णांना आधार देणाऱ्या रोपाचे बनले वटवृक्ष'; डॉक्टर्स, रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावना
By संतोष हिरेमठ | Published: November 23, 2023 08:12 PM2023-11-23T20:12:41+5:302023-11-23T20:13:27+5:30
शासकीय कर्करोग रुग्णालय : राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांच्या नातेवाईकांना अन्न वाटप
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब कर्करोगाच्या रुग्णांसाठी महाराष्ट्राचे माजी उद्योग व शालेय शिक्षणमंत्री आणि लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या रुपाने एक रोपटे लावले होते. आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. रुग्णालयाचे विस्तारीकरण होऊन अद्ययावत सोयीसुविधा वाढत आहेत, अशी भावना डाॅक्टर्स आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी शासकीय कर्करोग रुग्णालयातील (राज्य कर्करोग संस्था) लायन्स अन्नछत्र येथे रुग्णांच्या नातेवाईकांना अन्न वाटप करण्यात आले. शासकीय कर्करोग रुग्णालयात लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणा यांच्या माध्यमातून अन्नछत्र चालविण्यात येते. दररोज याठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी २०० ते २५० जणांना अन्न वाटप केले जाते. याप्रसंगी राजेंद्र दर्डा यांनी रुग्णालयातील नव्या अत्याधुनिक ट्रु बिम या किरणोपचार यंत्राची आणि बंकरची पाहणी केली. रुग्ण आणि नातेवाईकांशी संवाद साधत आस्थेवाईकपणे विचारपूसही केली.
रुग्णालयातर्फे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी राजेंद्र दर्डा यांचा सत्कार केला. अन्नछत्र उपक्रमाबद्दल राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन लायन्स परिवाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिकलठाणाच्या अध्यक्षा डाॅ. उज्ज्वला दहिफळे, लायन्स अन्नछत्राचे प्रकल्प प्रमुख डाॅ. संजीव गुप्ता, प्रोजेक्ट को-चेअरमन राजेश शुक्ला, रमेश पोकर्णा, राजकुमार टिबडीवाला, डाॅ. दत्ता कदम, डाॅ. मनोहर अग्रवाल, राजेश जाधव, भूषण जोशी, महेश बुऱ्हाडे, राहुल औसेकर आणि शासकीय कर्करोग रुग्णालयाचे डाॅ. प्रभाकर जिरवणकर, डाॅ. श्रीराम गोसावी, डाॅ. महेश रेवाडकर, प्रशासकीय अधिकारी रमेश ताठे, फारुक अजीज, विशाल जाधव, मेट्रन खैरुनिसा शेख, कैलास चिंतले, संदीप भडांगे, बालाजी देशमुख, पुंडलिक खरात, रवीकांत अपार, बाळू निकाळजे आदी उपस्थित होते.