बंडखोरीनंतर आता मंत्रिपदासाठी लॉबिंग; जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे समर्थक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 08:18 PM2022-07-02T20:18:03+5:302022-07-02T20:19:19+5:30
आ. संजय शिरसाट यांनी पालकमंत्रिपदासाठी दावा करण्यास सुरुवात केली असून आ. प्रदीप जैस्वाल यांनाही एखादे खाते मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
औरंगाबाद : शिवसेनेतून बंड करीत बाहेर पडून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्या गटात जिल्ह्यातील पाच आमदार सामील झाले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात पाच आमदार आघाडीवर राहिले आहेत. त्यात दोन मंत्री सहभागी आहेत. त्यातील संदीपान भुमरे हे तर कॅबिनेट मंत्री आणि अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री आहेत. बंडखोरीमुळे शिवसेनेने त्यांची मंत्रिपदे काढून घेतली, तरी या बंडखोर आमदारांनी आता मंत्रिमंडळात वर्णी लागावी, यासाठी लॉबिंग सुरू केले आहे.
आ. संजय शिरसाट यांनी पालकमंत्रिपदासाठी दावा करण्यास सुरुवात केली असून आ. प्रदीप जैस्वाल यांनाही एखादे खाते मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. तसेच आ. रमेश बोरणारे यांना महामंडळ मिळू शकते. आ. भुमरे आणि आ. सत्तार यांचे मंत्रिपद कायम राहणार असले तरी या दोघांनाही खाते बदलून घेण्याची इच्छा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पालकमंत्रिपद जिल्ह्यातील आमदाराला मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार आ. संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी २६ जून रोजी पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याबाबतचा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. आ. भुमरे आणि आ. सत्तार या दोघांनाही मंत्री होण्याची संधी मिळणार आहे. बंडखोरी करताना राजकीय भवितव्य पणाला लावून या पाचही आमदारांनी शिवसेनेशी पंगा घेतला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या कट्टर समर्थकांत त्यांचा क्रमांक वरचा आहे. त्यामुळे ११ जुलैपर्यंत होणाऱ्या राजकीय घडामोडीत जिल्ह्यात किती मंत्रिपदे मिळतात, याकडे लक्ष लागले आहे.
आ. शिरसाटांना पालकमंत्रिपदाची अपेक्षा
पश्चिम मतदारसंघात हॅटट्रिक केल्यानंतर आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी अपेक्षा आ. शिरसाट यांना होती. २०१४ ते २०१९ पर्यंतच्या भाजप-शिवसेना सरकारमध्येही आ. शिरसाट यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे ते तेव्हापासूनच नाराज होते. त्यातच जिल्ह्यातील संघटनात्मक राजकारणातही त्यांनी बदलाची मागणी केली होती; परंतु त्यातही काही न झाल्याने ते शिवसेना नेतृत्वावर नाराज होते. आता त्यांना पालकमंत्री होण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांची आमदारांशी चर्चा
मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी गोव्यात आपल्या गटातील सर्व आमदारांशी चर्चा केली. येत्या एक-दोन दिवसांत शिंदे गटातील सर्व आमदार मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आ. शिरसाट यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आज सर्वांशी चर्चा केली. आ. जैस्वाल म्हणाले, आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या विचारानेच शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत.