आता पोलिसांच्या रात्रगस्तीवर क्यूआर कोडची नजर; औरंगाबादेत राज्यातील पहिलाच प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 03:11 PM2021-01-29T15:11:08+5:302021-01-29T15:13:28+5:30
QR code used for police night patrols औरंगाबाद शहरात १ हजार ठिकाणी बसविणार क्यूआर कोड
- खुशालचंद बाहेती
औरंगाबाद : औरंगाबाद पोलिसांनी हायटेक होण्याच्यादृष्टीने पुढचे पाऊल टाकले असून, आता पोलिसांच्या रात्रगस्तीवर क्यूआर कोडच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. गस्तीची पारंपरिक पद्धत मोडीत काढून ती अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या संकल्पनेतून राज्यात पहिलाच पथदर्शी प्रयोग शहरात राबविला जात आहे. या अभिनव प्रयोगाचे उद्घाटन २९ जानेवारी रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते होणार आहे.
लूटमार, चोऱ्या, घरफोड्या या व अन्य गुन्हेगारी करवाया रोखण्यासाठी पोलिसांची रात्री गस्त असते. दक्षता व गस्तीमुळे अनेक गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी रात्र गस्तीचे मार्ग आणि गस्तीमध्ये पोलिसांनी भेट देण्याची ठिकाणे निश्चित केली जात असत. यासाठी सर्व ठिकाणी पुस्तक ठेवले जात असे. गस्त ठिकाणी भेट देणारे पोलीस कर्मचारी भेटीची वेळ टाकून या पुस्तकात स्वाक्षरी करीत असत. वरिष्ठ अधिकारी काही ठिकाणी भेट देऊन तपासणी करीत असत. तेही या पुस्तकात नमूद करून स्वाक्षरी करीत असत. याला आता माहिती व तंत्रज्ञानाची जोड देत औरंगाबाद पोलिसांनी क्यूआर कोडवर आधारित गस्तीचा पथदर्शी प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहराचे जीआयएस मॅपिंग करून क्यूआर कोड बसविण्यासाठी १ हजार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. आगामी काळात ही ठिकाणे वाढविली जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
अशी असेल पद्धती...
शहरातील निश्चित केलेल्या १ हजार ठिकाणांवर क्यूआर कोडचे फलक लावले जातील. गस्तीवर असलेले संबंधित कर्मचारी व तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याचे स्कॅनिंग करावे लागेल. कोड स्कॅन करताच याची माहिती व वेळ नियंत्रण कक्षाला तात्काळ कळेल. या पद्धतीमुळे रात्रगस्त अधिक परिणामकारक होईल. तसेच गस्तीवर गैरहजर असणाऱ्यांना प्रतिबंध हाेईल.