मराठी भाषा संवर्धन पुरस्कार आता दोन लाख रुपयांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:26 AM2018-02-05T00:26:31+5:302018-02-05T00:26:39+5:30
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून देणात येणा-या भाषा संवर्धन पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून देणात येणा-या भाषा संवर्धन पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार या पुरस्कारांची रक्कम आता एक लाखावरून दोन लाख रुपये करण्यात आली आहे.
विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ. अशोक केळकर यांच्या नावे ‘मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार’ आणि कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावे ‘मराठी भाषा संवर्धक पुरस्कार’ देण्यात येतात. पहिले पुरस्कार २०१६ मध्ये देण्यात आले होते.
मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाºया व्यक्ती किंवा संस्थेला हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. भाजी विक्रीचा व्यवसाय करताना वाचनाची आवड जोपासणा-या औरंगाबादच्या बेबिताई गायकवाड पहिल्या ‘भाषा संवर्धक’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या.
परदेशी नागरिक डॉ. मॅक्सीन बर्नसन यांना मराठी भाषा शिकून व मराठी भाषेचा सखोल अभ्यास करण्याचे कार्य केल्याबद्दल पहिला ‘भाषा अभ्यासक’ पुरस्कार देण्यात आला होता.
२०१७ साली दुस-या भाषा संवर्धक पुरस्काराने श्याम जोशी यांना, तर भाषा अभ्यासक पुरस्काराने यास्मिन शेख यांना सन्मानित करण्यात आले होते.
या पुरस्कारांचे नवीन स्वरूप दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे राहील. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावे अद्याप घोषित करण्यात आलेली
नाही.