आता एक महिन्यानंतर करणार महसूल कर्मचारी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:28 PM2019-05-27T21:28:50+5:302019-05-27T21:29:06+5:30
कन्नड मंडळ अधिकारी, वाहनचालक प्रकरणात कोण दोषी आहे, याचा शोध महिनाभरात घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, तलाठी संघाचे सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.
औरंगाबाद : महसूल कर्मचारी संघटनांचे कामबंद आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेतल्यानंतर संघटनांनी एक महिन्याचा अल्टिमेटम देत आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले. कन्नड मंडळ अधिकारी, वाहनचालक प्रकरणात कोण दोषी आहे, याचा शोध महिनाभरात घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, तलाठी संघाचे सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक मतमोजणी झाल्यानंतर दोन दिवसांपासून कर्मचारी संघटनांकडून कामबंद आंदोलन स्थगित करायचे की सुरू ठेवायचे, यावर संभ्रम असल्याचे चित्र होते.
टंचाई उपाययोजनांसाठी अनेक कर्मचाºयांना आंदोलनातही कामावर हजर राहावे लागल्यामुळे सोमवारी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात एका ट्रॅक्टर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने मंडळ अधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या व संबंधित पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेसह जिल्हा तलाठी संघ, जिल्हा सरकारी मध्यवर्ती संघटना, तहसीलदार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, नायब तहसीलदार संघटनेने गेल्या दहा दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते.
आंदोलनाला धारच नव्हती
दुष्काळ नियोजन, चारा छावणी व निवडणुकीच्या कामांमुळे बहुतांश विभागातील कर्मचारी कामावर हजर असल्यामुळे कामबंद आंदोलनाला परिणामकारक अशी धार नव्हती. त्यामुळे कामबंद आंदोलन कागदावरच वाटत होते. दुष्काळामुळे सगळीच यंत्रणा कामावर असल्यामुळे आंदोलन नावापुरतेच सुरू असल्याचे दिसले.
महसूल कर्मचाºयांविरुद्ध नोंदविलेले गुन्हा मागे घेत संबंधित पोलीस निरीक्षकांवर निलंबनाच्या कार्यवाहीसाठी जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी कृती संघटनांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे.