आता महापालिकेचे लसीकरण केंद्र खाजगी रुग्णालयांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:05 AM2021-01-19T04:05:16+5:302021-01-19T04:05:16+5:30
औरंगाबाद : केंद्र शासनाचे कोविन अॅप बंद पडल्यामुळे कोरोना लसीकरणाची मोहीम दोन दिवस बंद करण्यात आली होती. पहिल्या दिवशी ...
औरंगाबाद : केंद्र शासनाचे कोविन अॅप बंद पडल्यामुळे कोरोना लसीकरणाची मोहीम दोन दिवस बंद करण्यात आली होती. पहिल्या दिवशी ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली त्यांना रिॲक्शन झाल्यामुळे महापालिकेने सर्व लसीकरण केंद्रे खासगी रुग्णालयांत स्थलांतरित केली आहेत. मंगळवारपासून लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे.
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेने बन्सीलालनगर, सिडको एन-११, एन-८, सादातनगर, भीमनगर येथील आरोग्य केंद्राची निवड केली होती; परंतु ही पाचही केंद्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील एमजीएम, हेडगेवार, धूत, बजाज, मेडिकव्हर या पाच खासगी रुग्णालयांत लसीकरणाचे केंद्र स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी मनपाचे पथक राहणार असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोरोना लसीकरण केले जाणार आहे. लस दिल्यानंतर रिअॅक्शन झाली तर तातडीने उपचार करता यावेत या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
कोविन अॅपद्वारे संदेश
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेने तयारी केली असली तरी पहिल्याच दिवशी कोविन अॅप बंद पडल्यामुळे लाभार्थ्यांना संदेश पाठविण्यासाठी आरोग्य विभागाची धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत कंट्रोल रूममधून मोबाइलवर संदेश पाठविण्यात आले. शनिवारी लसीकरण झाल्यानंतर कोविन अॅप बंद पडल्यामुळे दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले. सोमवारी कोविन अॅप सुरू करण्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने एक पथक नेमले असून, या पथकाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कोविन अॅपद्वारे संदेश पाठविण्याचे काम सुरू केले आहे. दुपारनंतर शहरातील पाचशे लाभार्थ्यांना संदेश पाठविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. कोविन अॅप धीम्या गतीने चालत असल्यामुळे निरोप देण्यास वेळ लागत आहे, असेही डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.