'सारी'ऐवजी आता न्यूमोनिया,केंद्राकडून गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 07:03 PM2020-04-17T19:03:59+5:302020-04-17T19:06:08+5:30
'सारी'त निगेटिव्हचे प्रमाण अधिक, चिंता करू नये, तज्ज्ञचे आवाहन
औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात सारी'चे (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) संकट वाढत आहे. कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण आढळून येत आहे. तर 'सारी'च्या रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 'सारी'ची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे 'सारी'ऐवजी न्यूमोनिया पुढे केला जात आहे.
सध्या कोरोनाबरोबरच 'सारी'च्या रुग्णांचे वाढते प्रमाण चिंतादायक ठरत आहे. शहरात पहिल्यांदा २४ मार्च रोजी कोरोनासदृश्य सारीने एकाचा मृत्यू झाल्याचे समोरे आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर २९ मार्च ते ७ एप्रिल या १० दिवसात ११ जणांचे बळी घेतले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
राज्य सरकारसह केंद्र सरकारपर्यंत 'सारी'ची माहिती पोहोचली. शहरात आतापर्यंत 'सारी'च्या १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याची गंभीर दखल घेत कोरोना , सारी तसेच इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. विशेषतः सारीसाठी १३ ठिकाणी ताप तपासणी केंद्र स्थापन केले आहेत. मात्र, 'सारी'च्या रुग्णसंख्येत रोज भर पडत आहे. त्याच्या वाढत्या प्रमाणाने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे 'सारी' ऐवजी आता न्यूमोनिया पुढे केला जात आहे. 'सारी'ऐवजी न्यूमोनिया रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. न्यूमोनियाच्या रुग्णांचेही स्वब तापणीसाठी घेतले जात आहेत. अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात उशिरा येतात. ही बाबही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
१७७ जण निगेटिव्ह शहरात १५ एप्रिलपर्यत सारीचे २०० रुग्ण समोर आले होते. यात १७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. यात घाटीत दाखल ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. 'सारी'त निगेटिव्हचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे चिंता करू नये, असे आवाहन तज्ज्ञनी केले.
वेळीच उपचार घ्यावे
अनेक रुग्ण वेळीच उपचार घेत नाही. गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात उशीराने दाखल होतात. मात्र, वेळीच उपचार घेण्याची गरज आहे. 'सारी'च्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाण अधीक आहे.
- डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसीन, घाटी