आता वाहन उचलण्यापूर्वी पोलीस देणार भोंग्याद्वारे इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 07:27 PM2018-06-07T19:27:11+5:302018-06-07T19:27:52+5:30
वाहतूक शाखेचे पोलीस आता रस्त्यावरील दुचाकी उचलण्यापूर्वी वाहनधारकांंना भोंग्याद्वारे इशारा देत आहेत.
औरंगाबाद : रस्त्यावरील दुचाकी उचलून नेण्याच्या वाहतूक पोलिसांच्या मनमानी पद्धतीवर ‘लोकमत’ने २८ मे रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रकाश टाकला होता. या वृत्ताची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस आता रस्त्यावरील दुचाकी उचलण्यापूर्वी वाहनधारकांंना भोंग्याद्वारे इशारा देत आहेत.
रस्त्यावरील दुचाकी उचलण्यासाठी येणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर असे भोंगे लावण्यात आले असून, याद्वारे पोलीस ‘रस्त्यावरील वाहने उचला, अन्यथा ती उचलून नेण्यात येतील’ अशा प्रकारचा इशारा देताना दिसत आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी कारकडे दुर्लक्ष करून वाहतूक पोलीस दुचाकींना लक्ष्य करीत असतात. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने रस्त्यावरून हटविणे एवढा एकमेव उद्देश वाहतूक पोलिसांचा असणे आवश्यक आहे. असे असताना वाहतूक पोलीस मात्र दुचाकी उचलून नेण्याच्या नावाखाली केवळ महसूल जमा करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र शहरात आहे. पोलिसांची दुचाकी उचलण्याची पद्धत चुकीची असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. या वृत्तात दुचाकी उचलण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी अनाऊन्सिंग (भोंग्याद्वारे इशारा) करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते.
या वृत्ताची गंभीर दखल वाहतूक विभागाने घेतली आणि रस्त्यावरील वाहने उचलून ज्या वाहनातून नेण्यात येतात, त्या वाहनांना पोलिसांनी प्रत्येकी दोन भोंगे लावले. शिवाय प्रत्येक वाहनातील वाहतूक पोलीस माईकवरून रस्त्यावरील वाहने काढण्याचे आवाहन नागरिकांना करताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांचे वाहन येताच नागरिक रस्त्यावरील त्यांचे वाहन काढून घेतात. जे नागरिक वाहने काढत नाहीत, त्यांची वाहने उचलून नेण्याचे काम मात्र पोलीस करीत असतात.
आता लक्ष्य चारचाकी वाहने
रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. विशेषत: निराला बाजार, उस्मानपुरा, क्रांतीचौक, पैठणगेट, औरंगपुरा, टीव्ही सेंटर ते जळगाव रोड या भागात रस्त्यावर लावलेल्या दुचाकीसह चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. आता वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर अडथळा ठरणारी चारचाकी वाहनेही उचलण्याचे काम बुधवारपासून चालू केले आहे.