आता खड्ड्यांचेही होणार सर्वेक्षण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:20 AM2017-11-28T01:20:02+5:302017-11-28T01:20:06+5:30
महापालिकेच्या हद्दीत १४०० किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर नेमके किती खड्डे आहेत, याचीच माहिती मनपाकडे नाही. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण अत्याधुनिक पद्धतीने करून देण्यासाठी एक खाजगी संस्था सरसावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीत १४०० किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर नेमके किती खड्डे आहेत, याचीच माहिती मनपाकडे नाही. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण अत्याधुनिक पद्धतीने करून देण्यासाठी एक खाजगी संस्था सरसावली आहे. महापालिका या संस्थेच्या सहकार्याने खड्ड्यांची डाटा बँक तयार करणार असून, त्यानंतर संस्थेने दिलेल्या सूचनेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे बुजविण्यात येतील. या कामामुळे मनपाच्या खर्चात आणखी बचत होणार असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
शहरातील उद्योजक रणजित देशमुख यांनी ‘रोड बाऊन्स’ ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्था रस्त्यांचे जिओ टॅगिंगने मॅपिंग करून देते. आंतरराष्टÑीय पातळीवरही संस्था हे काम करते. रस्त्यांचे सर्वेक्षण करून अपघात स्थळ, मोठे खड्डे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ५० हजार कि.मी. रस्त्याचे सर्वेक्षण करून घेतले
आहे.
महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, शहरात दीडशे कोटींचे रस्ते तयार केले जाणार आहेत. हे रस्ते वगळून उर्वरित सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण संस्थेकडून केले जाणार आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर सर्वेक्षण होणार आहे. कोणत्या रस्त्यावर किती वाहतुकीची वर्दळ आहे. खड्ड्यांची वर्गवारी करण्यात येईल. कोणत्या खड्ड्याला कशा पद्धतीने बुजवावे याचे गणितही संस्था मांडून देणार आहे. सर्वेक्षण तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत केले जाते.