मराठा आरक्षण मागणीसाठी आता शहरातील विविध वॉर्डात आंदोलन
By बापू सोळुंके | Published: October 27, 2023 05:37 PM2023-10-27T17:37:53+5:302023-10-27T17:39:28+5:30
कालपासून हनुमाननगर चौकात आणि आज शहरातील जटवाडा रोडवरील सारा वैभव आणि पुंडलिकनगर येथे आंदोलन सुरू झाले.
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला २५ ऑक्टोबरपासून सुरवात झाली. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. यापाठोपाठ कालपासून हनुमाननगर चौकात आणि आज शहरातील जटवाडा रोडवरील सारा वैभव आणि पुंडलिकनगर येथे आंदोलन सुरू झाले.
पुंडलिकनगर येथे आज ठिय्या उद्यापासून उपोषण
शहरातील पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्यावतीने आजपासून आंदोलनाला सुरवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ आहे, अशा घोषणा आंदोलक देत होते. या आंदोलनात ज्ञानेश्वर गायकवाड,नारायण काकडे, कृष्णा शिंदे, शंकरराव आडसुळ, गणेश थोरात,बापू कवळे, प्रवीण सरोवर, पांडुरंग मोताळे, अजय गंडे, ज्ञानेश्वर नवले, भाऊसाहेब गारुळे, आसाराम चव्हाण, दत्ता घारे पाटील, प्रभाकर मोगल, सुभाष मोढे,अशोक खोसरे आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला. उद्या शनिवारपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले.
सारा वैभव सोसायटीत साखळी उपोषण
मराठा समाजााला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन करण्यासाठी जटवाडा रोडवरील साराव वैभव सोसायटीच्या मुख्य गेटवर सारा वैभव सोसायटी मित्रमंडळाच्यावतीने शुक्रवारी सकाळपासून साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली. या आंदोलनात अशोक हिवराळे, दामोदर पवार,सुभाष काकडे, गणेश पटेल, प्रकाश दंदाले, बाबासाहेब जंगले, किशनराव बिरादार, सुनील मोरे आणि किरण पाथ्रीकर आदींसह परिसरातील समाजबांधवांनी सहभाग नोंदविला.