आता नववीच्या अभ्यासक्रमावर २0 गुणांचे प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:31 AM2018-09-03T01:31:02+5:302018-09-03T01:31:23+5:30
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता दहावीपासूनच तयार झाली पाहिजे, या उद्देशाने यंदापासून दहावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी केले असून, पूर्वज्ञानावर (इयत्ता ९ वी) आधारित २० टक्के गुणांच्या प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे
विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता दहावीपासूनच तयार झाली पाहिजे, या उद्देशाने यंदापासून दहावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी केले असून, पूर्वज्ञानावर (इयत्ता ९ वी) आधारित २० टक्के गुणांच्या प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे, असे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, या वर्षापासून केवळ दहावीच्याच अभ्यासक्रमावर आधारित दहावीची परीक्षा असणार नाही. गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठी २० टक्के गुणांचे प्रश्न हे पूर्वज्ञानावर आधारित असतील. पूर्वज्ञानावर आधारित प्रश्नांचे स्वरूप नेमके काय असेल, पूर्वज्ञानावर नेमके कोणत्या इयत्तेचे प्रश्न असतील, कोणत्या धड्यावर ते प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांबाबत शाळा, मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही संदिग्धता आहे. ही संदिग्धता दूर करण्यासाठी, तसेच बदललेल्या परीक्षा पद्धतीमध्ये जिल्ह्याचा निकाल टिकवून ठेवणे व निकाल उंचावण्यासाठी ‘मिशन एसएससी २०१९’ हा उपक्रम जिल्ह्यात सुरू केला आहे. यासाठी निवडक तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने प्रश्नपेढी (क्वेश्चन बँक) तयार केली आहे.
झालेल्या चुका, दिलेले गुण, सर्वच प्रक्रिया दिसेल अॅपवर
यंदा दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेल्या परीक्षा पद्धतीचा विचार करता इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता स्थिती समजून घेण्यासाठी ‘मोबाईल अॅप’ विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हे ‘अॅप डाऊनलोड’ करून घ्यावे. त्या अॅपच्या माध्यमातून दुस-या व चौथ्या शनिवारी ‘ईझी टेस्ट’ द्यायची आहे. मुलांनी घरी बसल्या बसल्या ही चाचणी मोबाईलवर दिल्यानंतर लगेच निकालही पाहायला मिळेल. आपणास किती गुण मिळाले, आपले किती प्रश्न चुकले, चुकलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होते, हे सविस्तर अॅपवर दिसेल.
ही चाचणी ऐच्छिक राहणार असली, तरी विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता तपासण्यासाठी उपयोगी राहील. यासाठी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्या, सोमवारी सूचना दिल्या जाणार आहेत.