आता शाळेत वाचा गोष्टीची पुस्तके ! राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वाचन चळवळ’ उपक्रम
By राम शिनगारे | Published: December 21, 2023 07:01 PM2023-12-21T19:01:44+5:302023-12-21T19:02:04+5:30
या उपक्रमामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून आठवीपर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’, अशी चळवळ युनिसेफ, प्रथम बुक्स व रीड इंडिया यांच्यासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविली जाणार आहे.
तिसरीपर्यंतच्या प्रत्येक मुलामध्ये वाचन कौशल्य निर्माण करतानाच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून त्यांच्यावर चांगले संस्कार होतानाच मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग देखील तयार होईल, मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण होईल, हा योजनेचा उद्देश असल्याचेही २२ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात म्हटले आहे.
काय आहे वाचन चळवळ?
दर आठवड्याला दोन तासिका : दर आठवड्यात दोन तास वाचन तासिका शाळेत घेण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन शाळेतील मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे. त्यासाठी डिजिटल प्लॅटफाॅर्मचाही वापर केला जाणार आहे.
गोष्टींचा वार शनिवार : गोष्टीचा वार शनिवार ठेवण्यात आला आहे. या दिवशी शासनाकडून शाळांना ई-पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही पुस्तके सर्वच भाषांतून असणार आहेत.
ॲप, डिजिटल वापर : उपक्रमास गती देण्यासाठी ब्रँड अँबेसेडर नेमणे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ॲप, मीडिया प्लॅटफॉर्मचा सहभाग घेणे व लोकांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी देण्याचे काम केले जाईल.
पुस्तकांचे प्रदर्शन : या उपक्रमात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शाळांमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन, ग्रंथोत्सव असे कार्यक्रम घेण्यात येतील. त्याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा भरविण्यात याव्यात, एक ते दोन मिनिटांचे व्हिडीओ करून ते योग्य ठिकाणी अपलोड करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
जिल्ह्यात शाळा किती?
जि. प. शाळा : २०८०
खासगी व्यवस्थापन शाळा : २४९१
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
या उपक्रमामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास आणि समृद्ध होण्यास मदतच होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शालेय शिक्षण विभाग परिश्रम घेत आहे.
- जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. छत्रपती संभाजीनगर