आता रिक्षाचालक प्रशासनाच्या रडारवर; कोरोना लस घेतली नसेल तर रिक्षा होणार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 12:25 PM2021-11-27T12:25:15+5:302021-11-27T12:26:29+5:30
Corona Vaccination in Aurangabad : लसीची एकही मात्रा न घेतलेल्या रिक्षाचालकांवर सोमवारी सकाळी १० वाजेपासून दंडात्मक व जप्तीची कारवाई होणार आहे.
औरंगाबाद: लसीचा एकही डोस न घेणाऱ्या रिक्षाचालकांवर सोमवारपासून ( दि.२८) दंडासह वाहन जप्तीची कारवाई (If not vaccinated, the rickshaw will be confiscated) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांनाच खासगी बसचालकांनी तिकीट द्यावे ( No Vaccine, No Bus Ticket ), असेही आदेश काढले आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन रोज नव्याने आदेश काढीत आहे. शुक्रवारी सायंकाळी रिक्षा आणि खासगी बसचालकांसाठी प्रशासनाने आदेश काढला. लसीची एकही मात्रा न घेतलेल्या रिक्षाचालकांवर सोमवारी सकाळी १० वाजेपासून दंडात्मक व जप्तीची कारवाई होणार आहे. पंतप्रधानांच्या आदेशानंतर प्रशासनाने कंबर कसली असून सुरुवातीला पेट्रोल, गॅस, रेशन घेण्यासाठी लस घेणे बंधनकारक केले. त्यानंतर लस नसेल तर वेतन मिळणार नाही. सरकारी कार्यालयात प्रवेश नाही, असे निर्णय घेतले. त्यामुळे लसीकरण केंद्रावर रांगाच रांगा दिसू लागल्या आहेत. औरंगाबादचा लसीकरण पॅटर्न राज्यभर लागू करण्याच्या अनुषंगाने कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. शुक्रवारच्या आदेशानुसार शहरात प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षा, खासगी बससंदर्भातील बंधने लागू केली आहेत. रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबीयांनी लस घेणे बंधनकारक आहे. त्यांचे लसीकरण झाले किंवा नाही, याची पडताळणी प्रादेशिक परिवहन कार्यालय करणार आहे.
लस घेतली असेल तरच बसचे तिकीट
खासगी बसने प्रवास करण्यासाठी लसीचा पहिला डोस घेतला असेल तरच तिकीट मिळणार आहे. आधारकार्ड- मोबाईल क्रमांकावर लस घेतली किंवा नाही? याची खातरजमा करण्यात यावी. खासगी बससाठी असलेले चालक, वाहक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी लस घेतली का? याची देखील पडताळणी करण्यात यावी. लसीचा किमान एक मात्राही घेतली नसेल तर वाहनावर दंडात्मक कारवाई करून वाहन जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओला दिले आहेत.
पेट्रोलपंपावर ५५० जणांना टोचली लस
शुक्रवारपासून क्रांतीचौक, उल्कानगरी, दिल्लीगेट या तीन पेट्रोलपंपांवर लसीकरण सुरू करण्यात आले. पेट्रोलपंपांवर पहिल्याच दिवशी साडेपाचशे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत ११ लाख ८० हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. चार केंद्रावर सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत लसीकरण केले जात असून लसीकरणाची वेळ देखील दोन तासांनी वाढविली आहे. क्रांतीचौक येथील पेट्रोलपंपावर १५०, उल्कानगरी येथील पंपावर २००, दिल्लीगेट पेट्रोलपंपावर २०० नागरिकांचे लसीकरण झाले.
शहरातील केंद्रांवर लागल्या रांगा
शहरातील ७१ लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. बुधवारी २० हजार १६८ तर गुरुवारी २१ हजार ४२९ नागरिकांनी लस घेतली. शुक्रवारी २१ हजारांच्या आसपास लसीकरण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली.