आता परतीच्या पावसावर रबीची भिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 05:09 PM2019-09-10T17:09:42+5:302019-09-10T17:10:28+5:30
पावसाच्या गैरहजेरीत अळीचा खरिपावर डल्ला
करमाड : पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु औरंगाबाद तालुका अद्याप कोरडाच आहे. पाऊस न झाल्याने लष्करी अळीने खरिपाचे पीक फस्त केले असून, आता परतीच्या पावसावर बळीराजाची मदार अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यासाठी, रबी हंगामातील पिके, फळपिके ब पशुधन वाचवण्यासाठी परतीच्या काळात वरूण राजाने कृपा करावी, अशी आशा बळीराजाला लागून राहिली आहे.
पावसाळा अखेरच्या टप्प्यात असून, अद्याप विहिरी, नदी-नाले, धरणे कोरडी पडलेली आहेत. मात्र, परतीचा पाऊस येईल या आशेवर बळीराजा रबीची स्वप्न रंगवत आहे. औरंगाबाद तालुक्यावर अद्याप एकाही मोठ्या पावसाने हजेरी लावली नसल्याने सुखना, लहुकी, बाबूवाडी सारखे पाझर तलाव मृतसाठ्यातच आहेत.
छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पाणी वाहिले नसल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. शिवाय मागील वर्षी सुरु झालेली पाणीटंचाई अद्याप संपलेली नाही. सप्टेंबर महिना आर्धा संपत आला तरी एकही दमदार पाऊस झाला नाही. बाजरी व मकावर लष्करी अळीने हल्ला चढवला.
या अळीमुळे उत्पन्न तर सोडा चाराही होण्याची आशा मावळली आहे. शिवाय कमी पाण्यामुळे कपाशीला फक्त 20 टक्के कैऱ्यांची उगवण झालेली आहे. कपाशी पिकातून खर्च सुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.
दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने किमान परतीच्या पाऊस जोरदार हजेरी लावेल या आशेवर बळीराजाचे रबीचे स्वप्न रंगवत आहे. या पिकातून जनावरासाठी चारा तर होतोच शिवाय गहु, ज्वारी हे धान्यही मिळते.प् ारंतु अद्याप तरी परतीच्या पावसाकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.