आता 'ती' मैत्रिणीलाच म्हणते, माझ्याशी लग्न कर, नाहीतर...; 'लिव्हइन' नात्याने घेतले नवे वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:00 PM2022-03-23T17:00:59+5:302022-03-23T17:02:04+5:30
यातच वर्षभरापूर्वी एकीने आपण लग्न करू, माझ्यासोबत पळून चल, असे म्हणत दुसरीवर दबाव टाकणे सुरु केले.
औरंगाबाद : प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन समलिंगी मैत्रिणींचे ब्रेकअप झाले अन प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेल्याचा प्रकार शहरात घडला आहे. ब्रेकअपनंतर एका तरुणीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दुसरीने सुरुवातीला दामिनी पथक आणि नंतर क्रांती चौक गाठले. पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून घेत दोघींकडून हमीपत्र लिहून देऊन प्रकरणावर पडदा टाकला आहे.
याबाबतच्या प्राथमिक माहिती नुसार, समीक्षा आणि दिपाली ( नावे बदललेली आहेत ) या वर्ग मैत्रिणी आहेत. समीक्षा ही काहीशी लाजरी तर दिपाली मुलांप्रमाणे बिनधास्त वागणारी आहे. त्यांच्यातील मैत्री सर्वश्रुत होती. मात्र, दीपालीने चार वर्षांपूर्वी समिक्षाला माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण सोबत राहू अशी गळ घातली. यातून दोघीही सोबत राहू लागल्या. दोघीही मुलीच असल्याने पालकांना काही वेगळे वाटले नाही. दिपाली मुलांप्रमाणे समीक्षावर हक्क गाजवत असे. यातच वर्षभरापूर्वी दीपालीने आपण लग्न करू, माझ्यासोबत पळून चल, असे म्हणत दबाव टाकणे सुरु केले. समलिंगी नाते नकोसे झाल्याने आणि दीपालीच्या वागण्यास कंटाळ्याने समीक्षाने ब्रेकअपचा निर्णय घेतला.
हा निर्णय दीपालीला पटला नाही. तिने पुन्हा लग्नाची गळ घातली, पण समीक्षा ऐकत नव्हती. यामुळे दीपालीने दोघींची काही छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची, आत्महत्येची धमकी दिली. यामुळे समीक्षा घाबरली. तिने तिने थेट दामिनी पथकाच्या प्रमुख सुषमा पवार यांना संपर्क साधला. यानंतर प्रकरण क्रांती चौक पोलिसात गेले. पोलिसांनी गांभीर्याने प्रकरण हाताळत दोघींना पालकासह ठाण्यात बोलवले. त्यांनतर पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. दोघींनी समजुतीची भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून कुटुंबासमोर हमीपत्र लिहून घेत सोडले. मात्र, चारवर्ष लिव्ह-इन रिलेशन, ब्रेकअप नंतर थेट आत्महत्येची धमकी असे ट्विस्ट असलेल्या या वेगळ्या प्रेमप्रकरणाला काय नाव द्यावे ? अशी चर्चा सुरु झाली आहे.