आता भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून वादाची ठिणगी; कृती समिती उतरली मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 03:24 PM2022-09-24T15:24:19+5:302022-09-24T15:40:30+5:30
कृती समितीने मेळावा आयोजनाची तयारी सुरु केल्याने भगवान गड आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.
औरंगाबाद: मुंबईत शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या कोणत्या गटाचा दसरा मेळावा हा वाद न्यायालयात निकाली निघाला नाही तोच आता भगवान गडाच्या पायथ्याशी खंडित मेळावा पुन्हा सुरु करण्याचे कृती समितीने जाहीर केल्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे. भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूने खंडित झाली आहे. तीच पक्षविरहित मेळाव्याची परंपरा पुन्हा सुरु करणार असल्याचे या कृती समितीने स्पष्ट केले आहे.
भगवान गडावर संत भगवान बाबा यांनी दसरा मेळावा सुरु केला. हिच परंपरा स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पुढे ठेवली. येथील मेळाव्यास राजकीय अंग नसेल ही एकमेव अट होती. गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीत दरवर्षी या ठिकाणी उत्स्फूर्त मेळावे होत. मात्र, त्यांच्या मृत्युनंतर काही मतभेद झाल्याने गडावरील मेळाव्याची परंपरा खंडित झाली. दरम्यान, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान बाबा यांच्या मुळगावी सावरगाव येथे मेळावा घेण्यात सुरुवात केली आहे. सर्वकाही सुरळीत सुरु आहे असे वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी भगवान गडावर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. तर आता भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी एक कृती समिती मैदानात उतरली आहे. यामुळे भगवान गड आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.
खंडित मेळावा पुन्हा सुरु करणार
कृती समिती कोणालाच आव्हान देत नाही. आम्ही केवळ गडावरील मेळाव्याची परंपरा पुन्हा सुरु करत आहोत. हा मेळावा पक्षविरहित असून कृती समितीत सर्वजन आपले पक्ष बाजूला ठेऊन आले आहेत. दसऱ्याला होणाऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांनी यावे, असे आवाहनही कृती समितीने केले आहे. तसेच महंत नामदेव शास्त्री यांचा गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यास विरोध नसेल. आम्ही त्यांच्याशी संपर्क करू, असेही कृती समितीने स्पष्ट केले आहे.
अशी आहे कृती समिती
बाळासाहेब सानप ( औरंगाबाद, विनोद वाघ ( बुलढाणा), दादासाहेब मुंडे ( बीड), बाळासाहेब वाघ ( नाशिक ), देविदास खेडकर ( अहमदनगर), शिवराज बांगर ( बीड), रवींद्र नागरगोजे ( उस्मानाबाद ), राणाप्रताप पालवे ( अहमदनगर), अशोक लाडवंजारी ( जळगाव ), ईश्वर बुधवंत ( पुणे), विलास आघाव ( हिंगोली ), रमेश सानप ( अहमदनगर ) , सुभाष जावळे (पुणे), दिलीप घुगे ( हिंगोली ), सुग्रीव मुंडे ( बीड), बाबासाहेब ढाकणे ( पुणे ), गजानन ढाकणे ( जालना), विनोद सानप ( यवतमाळ ), सह्चीन इप्पर ( वाशीम), अनिल गरकर ( वाशीम) , वैभव घुगे ( अकोला)