आता विद्यापीठातील नवीन जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, वादग्रस्त जागा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 04:30 PM2021-06-08T16:30:45+5:302021-06-08T16:31:34+5:30
विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधी प्रशासनाने संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमलेली आहे.
औरंगाबाद : आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा विद्यापीठातील वनस्पती उद्यानाच्या जागेऐवजी प्रशासकीय इमारतीसमोरील लंच होमच्या बाजूला मोकळ्या जागेत उभारण्याचा निर्णय विद्यापीठाच्या पुतळा उभारणी समितीने सोमवारी घेतला.
विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधी प्रशासनाने संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमलेली आहे. या समितीने या वादावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत निंबाळकर, किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, म्हस्के व कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदींनी विद्यापीठातील तीन जागांवर चर्चा केली. यात इतिहास विभागामध्ये गर्द झाडी असल्यामुळे पुतळा झाकून जाईल. सामाजिकशास्त्रे विभागाच्या बाजूला पोस्ट कार्यालयाजवळ वनस्पती उद्यान असल्यामुळे पुन्हा वाद उद्भवू शकतो म्हणून ती जागाही नाकारण्यात आली. शेवटी प्रशासकीय इमारतीसमोर शहर वाहतूक बसथांब्याच्या बाजूला लंच होमशेजारील मोकळ्या जागेत पुतळ्यासाठी सर्वानुमते जागा निश्चित करण्यात आली.
विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे वनस्पती उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा नियोजित पुतळा उभारला जाणार होता. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधून संबंधित कंत्राटदाराने पुतळ्याच्या उभारणीसाठी जागेच्या सपाटीकरणाला सुरुवात केली होती. त्यावरून मोठे वादंग पेटले. विविध पक्ष-संघटनांनी वेगवेगळे तर्क काढून प्रशासनाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानी मुप्टा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध नाही; परंतु त्यासाठी निवडलेल्या जागेमुळे वनस्पतीशास्त्र विभागाचे उद्यान व जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता आहे, असा आरोप केला. इको निड्स फाउंडेशननेही हाच धागा पकडत या उद्यानातील अनेक दुर्मीळ वनस्पती नष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके व संशोधनाला मुकावे लागेल, अशी शंका उपस्थित केली, तर सर्वप्रथम रिपाइं युवक आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड दोन्ही महापुरुषांची तोंडे एकमेकांच्या विरोधी दर्शवून यातून विद्यार्थी व समाजाला कोणता संदेश देणार आहात, असा विद्यापीठाला प्रश्न विचारला होता. पुतळ्याच्या भूमिपूजनाअगोदरच हा वाद वाढत चालल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्याला कोणाच्या सांगण्यावरून हा उपद्व्याप केला, असा जाब विचारला होता.
व्यवस्थापन परिषदेत होणार अंतिम निर्णय
विद्यापीठातील पुतळ्यासंबंधीच्या समितीने नियोजित जागा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला जाईल. तिथे तो मान्य झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यालयास जागा बदलल्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.