'आता पायी वारी थांबवावी,मीच तुझ्या गावी येत आहे';आव्हाणे गावात आहे निद्रिस्त गणपतीची स्वयंभू मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 05:54 PM2022-02-04T17:54:20+5:302022-02-04T17:54:36+5:30
गणेश जयंती विशेष स्टोरी : देशातील बहुधा एकमेव, पैठणपासून ३० कि.मी.वर निद्रिस्त स्वयंभू मूर्ती
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती गणरायाची असंख्य रुपे आपण पाहिली असतील. मात्र, झोपलेला गणपती अशी कल्पनाही कधी मनात आली नसेल. कारण गणपती म्हणजे मांडी घालून बसलेला हेच डोळ्यासमोर येते. पण चिरेबंदी मंदिरात झोपलेल्या गणपतीचे दर्शन तुम्हाला घडले तर? ही कल्पना नव्हे. पैठणपासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर आव्हाणे नावाच्या गावातील मंदिरात स्वयंभू निद्रिस्त गणेशाचे दर्शन भक्तांना घडत आहे. हे मंदिर देशातील एकमेव असावे.
खुलताबादचा भद्रा मारुती झोपलेल्या अवस्थेत आहे. तशाच झोपलेल्या गणपतीचे दर्शन आव्हाणे गावात घडते. राज्य शासनाने २००५ मध्ये या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्रांच्या यादीत केला. पैठणपासून शेवगावकडे जाताना १३ कि.मी.अंतरावर आव्हाणे (बुद्रूक) हे गाव लागते. येथे शासनाने दिलेल्या ४४ लाखांच्या निधीतून चिरेबंदी मंदिर उभे राहिले. मंदिरात मध्यभागी जमिनीपासून तीन फूट खोल ही मूर्ती आहे. ‘तीन बाय अडीच फुटांची व शेंदूरी रंगातील; तीही उत्तरमुखी आहे. मूर्ती सुमारे ५०० वर्षे जुनी असल्याचे सांगतात. या मंदिरात तीन गणरायांचे भक्तांना दर्शन होते. एक निद्रिस्त गणपती, त्याच्या पाठीमागे भिंतीमध्ये मयुरेश्वराची मूर्ती व बाजूच्या मंदिरात रिद्धी, सिद्धी सोबत गणराय अशा तीन मूर्ती जवळजवळ आहेत. गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून मूर्तीला सोन्याचा मुकुट तयार केला.
दादोबा, गणोबा गणेश मूर्ती
निद्रिस्त गणेश मंदिराचे पुजारी काकासाहेब भालेराव यांनी आख्यायिका सांगितली की, आव्हाणे गावात पूर्वी दादोबा नावाचे गणेशभक्त राहत होते. ते दरवर्षी न चुकता गणेश जयंतीला मोरगावला मोरेश्वराच्या दर्शनासाठी पायी जात असत. नंतर वृद्धापकाळात वयोमानामुळे ही वारी त्यांना झेपेनाशी झाली. त्यावेळी दादोबांना दृष्टांत झाला की, ’आता पायी वारी थांबवावी, मीच तुझ्या गावी येत आहे’. दादोबांच्या निधनानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ टणक वस्तूला लागला. खोदले असता गणपतीची निद्रिस्त स्वयंभू मूर्ती दिसली. गणोबांना दृष्टांत झाला की, ही मूर्ती जशी आहे तशीच राहू दे. भाविकांनी निद्रिस्त गणपतीला ‘दादोबा’ तर बाजूला रिद्धी, सिद्धी सोबत असलेल्या मूर्तीला‘ गणोबा’ असे नाव दिले.
गणेश जयंतीला गावातील भाविक जातात मोरगावाला
दादोबा देवांचा वसा आव्हाणे गावातील गावकऱ्यांनी जपला आहे. दरवर्षी गणेश जयंतीला गावातील युवक मोरगावला जाऊन मोरेश्वराचे दर्शन घेतात.