आता फक्त ‘अंत्योदय’साठीच साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:58 AM2017-09-23T00:58:29+5:302017-09-23T00:58:29+5:30

सर्वसामान्यांसाठी असलेली सार्वजनिक वितरणप्रणालीही हळूहळू निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. आता इतर सर्व प्रवर्ग सोडता फक्त अंत्योदय अंतर्गतच साखर वितरित होत आहे

Now sugar for only 'Antyodaya' | आता फक्त ‘अंत्योदय’साठीच साखर

आता फक्त ‘अंत्योदय’साठीच साखर

googlenewsNext

स. सो. खंडाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सर्वसामान्यांसाठी असलेली सार्वजनिक वितरणप्रणालीही हळूहळू निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. आता इतर सर्व प्रवर्ग सोडता फक्त अंत्योदय अंतर्गतच साखर वितरित होत आहे व तीही एका शिधापत्रिकेवर फक्त एक किलो. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांची रेशनची साखर बंद करून सरकारने एका मोठ्या समूहाला नाराज करण्याची जोखीम पत्करली आहे.
पूर्वी शिधापत्रिकेवरील प्रत्येकाला अर्धा किलो साखर मिळायची. आता अंत्योदय अंतर्गत शिधापत्रिकेवर कितीही सदस्य असले तरी फक्त एक किलोच साखर रेशनवर मिळणार आहे. यामागे असे कोणते अजब तर्क लावण्यात आले, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १८ हजार रु. आहे, अशी कुटुंबे अंत्योदय अंतर्गत येतात. अंत्योदयच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या सुमारे ४० हजार असेल. आता एवढ्यांनाच फक्त अर्धा किलोप्रमाणे साखर देण्यात येत आहे. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांची साखर बंद केल्याने मोठीच खळबळ उडाली असून, त्यांच्यासारख्यांना साखरेची गरज असताना ती नाकारण्यात आली आहे. पूर्वी दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदयच्या शिधापत्रिकाधारकांना औरंगाबाद शहरात अडीच हजार क्विंटल साखर उपलब्ध व्हायची. आता ती फक्त अंत्योदयसाठी ४००-४५० क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात येईल.
रॉके ल ४० रु. लिटर होणार....
रॉकेलची सबसिडीही बंद करण्यात येणार असून, नजीकच्या काळात स्वस्त धान्य दुकानांमधून मिळणारे १८ रु. लिटरचे रॉकेल बंद होणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना रॉकेल विकता येईल, पण त्याचा भाव ४० रु. लिटर राहील. ते रॉकेल पांढरे राहील. कोणत्याही डीलरकडून आणून ते स्वस्त धान्य दुकानदारांना विकता येईल.
पूर्वी स्वस्त धान्य दुकानदार गोदामात जाऊन आपले धान्य उचलत असत. आता दुकानदारांना गोदामात जाण्याची गरज राहणार नाही. कारण यासाठी ठेकेदार नेमण्यात येणार असून ते त्यांच्याशी झालेल्या करारानुसार गोदामातील धान्य उचलून स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचवतील.

Web Title: Now sugar for only 'Antyodaya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.