आता सिनेमागृहात घेऊन जा घरचे खाद्यपदार्थ; १५ दिवसांत सिनेमागृहात लागणार फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 06:58 PM2017-12-07T18:58:23+5:302017-12-07T19:01:04+5:30
खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सिनेमागृहात मज्जाव करण्यात येत असेल, तर ते कायद्याने गैर आहे, यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी केले.
औरंगाबाद : सिनेमागृहामध्ये घरी तयार केलेले खाद्यपदार्थ, तसेच पाणी घेऊन जाण्यास प्रतिबंध नाहीच. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी जाताना ते पदार्थ घेऊन गेल्यास ग्राहकांनी आवाज उठवावा. कारण ते अन्न व पाणी आहे, स्फोटक पदार्थ नाहीत. खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सिनेमागृहात मज्जाव करण्यात येत असेल, तर ते कायद्याने गैर आहे, यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी केले.
अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या तेथील सुरक्षारक्षकाला ग्राहकहिताचे कायदे माहिती नसतात. घरातील पदार्थ नेण्यासाठी त्याने विरोध केल्यास सिनेमा सोडून देत त्या सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाविरोधात थेट पुरवठा अधिका-यांकडे येऊन त्यासंबंधी तक्रार द्या, असे आवाहनही देशपांडे यांनी केले. ग्राहकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजेत, असे सांगत देशपांडे म्हणाले, ग्राहकांनी भांडकुदळ होण्याची गरज आली आहे, सिनेमागृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ, तसेच पाणी घेऊन जाण्याबाबत बंदी नाहीच, सिनेमागृहातील सुरक्षारक्षकाने मागणी केल्यास त्यांना बाटलीतील पाणी किंवा घरून घेऊन गेलेल्या अन्नपदार्थांबाबत खात्री करून दिल्यास कोणतीही अडचण नाही, तरीही अडवणूक केली, तर त्यास ग्राहकांनी नियम विचारला पाहिजे. ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांच्याकडे तक्रार करावी, तसेच ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होत आहे, अतिरिक्त शुल्क, खराब प्रतीचा माल, सेवा मिळत असेल त्याठिकाणी त्याबद्दल तक्रार करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अवगत करता येईल, असेही देशपांडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक जागरण पंधरवड्यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीनंतर देशपांडे यांनी पत्रकारांशी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती दिली.
सिनेमागृहांना प्रतिबंध करता येणार नाही
सिनेमागृहात प्रेक्षकांनी स्वत:जवळच्या पाण्याच्या बाटल्या, घरगुती खाद्यपदार्थ (पोळीभाजी व इतर पदार्थ) तेथील व्यवस्थापनाला प्रतिबंध करता येणार नाही, असे करणे कायद्याने गैर आहे असे सूचनाफलक येत्या १५ दिवसांत प्रत्येक सिनेमागृहात आलेल्या प्रेक्षकांना दिसतील अशा ठिकाणी लावण्यात येणार आहेत, असे देशपांडे यांनी सांगितले.
ग्राहक जागरण पंधरवडा
१५ ते ३१ डिसेंबरदरम्यान ग्राहक जागरण पंधरवडा घेण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती समजेल अशा शब्दांत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रदर्शन, भित्तीपत्रक, परिसंवाद, मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्राहक हक्कांबाबत माहिती, निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना देशपांडे यांनी केल्या.