आता टार्गेट सिनिअर एशियन, वर्ल्डचॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:47 AM2018-07-30T00:47:44+5:302018-07-30T00:49:05+5:30
इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या कॉमन वेल्थ तलवारबाजी स्पर्धेत कॅडेट गटात दोन कास्यपदकांची कमाई करून भीमपराक्रम करणाऱ्या मराठवाड्याचा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याचे आता टार्गेट हे पुढील वर्षी होणाºया एशियन सिनिअर चॅम्पियनशिप आणि सिनिअर वर्ल्डचॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याचे आहे. आपण केलेल्या कसून सरावामुळेच इंग्लंडमधील कॉमन वेल्थ स्पर्धेत मेडल जिंकण्याचा आत्मविश्वास होता, असेही त्याने सांगितले. इंग्लंडमधील न्यू कॅसल येथे वैयक्तिक आणि सांघिक, असे दोन कास्यपदके जिंकणारा कॉमनवेल्थ स्पर्धेतील मराठवाड्याचा पहिला खेळाडू ठरणारा अभय शिंदे नुकताच औरंगाबादेत दाखल झाला. यावेळी रविवारी त्याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
जयंत कुलकर्णी।
औरंगाबाद : इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या कॉमन वेल्थ तलवारबाजी स्पर्धेत कॅडेट गटात दोन कास्यपदकांची कमाई करून भीमपराक्रम करणाऱ्या मराठवाड्याचा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याचे आता टार्गेट हे पुढील वर्षी होणाºया एशियन सिनिअर चॅम्पियनशिप आणि सिनिअर वर्ल्डचॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याचे आहे. आपण केलेल्या कसून सरावामुळेच इंग्लंडमधील कॉमन वेल्थ स्पर्धेत मेडल जिंकण्याचा आत्मविश्वास होता, असेही त्याने सांगितले.
इंग्लंडमधील न्यू कॅसल येथे वैयक्तिक आणि सांघिक, असे दोन कास्यपदके जिंकणारा कॉमनवेल्थ स्पर्धेतील मराठवाड्याचा पहिला खेळाडू ठरणारा अभय शिंदे नुकताच औरंगाबादेत दाखल झाला. यावेळी रविवारी त्याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
कॉमन वेल्थ स्पर्धेतील कामगिरीविषयी अभय म्हणाला, ‘साखळी फेरीतील ६ पैकी ५ लढती आपण जिंकताना चांगली सुरुवात करीत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. उपउपांत्यपूर्व फेरीत वेल्सच्या खेळाडूविरुद्ध १५-६ अशी सहज मात केली. उपांत्यपूर्व फेरीत पाय मुरगळल्यानंतरही कॅनडाच्या खेळाडूवर १५-१४ अशी मात करीत संघर्षपूर्ण विजय मिळवला. पाय मुरगळल्याचा परिणाम उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या लढतीत झाला. त्यामुळे या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने कास्यपदकावर समाधान मानावे लागले.’
या स्पर्धेसाठी भारतीय संघातील निवडीविषयी तो म्हणाला, ‘भारतीय संघाचे निवड करण्यासाठी औरंगाबादेतील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सिलेक्शन ट्रायल्स झाले. त्यात देशातील अव्वल आठ खेळाडूंचा समावेश होता. त्यात पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवून आपण भारतीय संघातील स्थान निश्चित केले. त्यानंतर दीड महिन्यापासून आपण दिवसातील तीन सत्रांत साडेनऊ तासांपेक्षा जास्त वेळ कसून सराव केला. या सरावामुळे भारतीय संघासाठी पदक जिंकण्याचा विश्वास होता आणि गाठीला याआधी याचवर्षी दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव गाठीला होता. हा अनुभव आपल्या कामाला आला. इंग्लंडमध्ये जर पाय दुखावला नसता, तर आपण अंतिम फेरीत निश्चितच धडक मारली असती आणि पदकांचा रंग बदलू शकलो असतो. आता दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर लागणारे कौशल्य आणि फिटनेस, मानसिकदृष्ट्या भक्कम असण्याविषयी आपल्याला जाण आली आहे. तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर खेळताना सामन्याआधी फारशी चिंता न करता प्रत्यक्ष खेळताना सर्वस्व पणाला लावून व स्वत:ला झोकून देऊन खेळणे आवश्यक असते, हा धडा आपण घेतला आहे. त्यानुसार भविष्यात कसून सराव करणार असून, पुढील वर्षी होणाºया सिनिअर एशियन चॅम्पियनशिप आणि सिनिअर वर्ल्डचॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकण्याचे आपले टार्गेट असणार आहे.’
वडील कृष्णा शिंदे आणि काका प्रवीण शिंदे हे दोघेही व्हॉलीबॉलचे खेळाडू आणि मामा राकेश खैरनार हेदेखील खेळाशी निगडित असतानाही तलवारबाजी या खेळाकडे वळण्याविषयी तो म्हणाला, ‘राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. उदय डोंगरे यांनी लहाणपणीच माझ्या पालकांना मला तलवारबाजी खेळविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मी तलवारबाजी खेळाकडे वळालो. प्रारंभी, एनआयएस प्रशिक्षक संजय भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाचे धडे गिरवले. त्यानंतर सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, दिनेश वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले आणि आठवीत असताना साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात निवड झाली. तेथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तुकाराम मेहेत्रे यांचे मला मार्गदर्शन लाभत आहे.
अभय शिंदे याच्या कामगिरीचा आलेख
२०१८ : इंग्लंड येथील कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेत कॅडेट गटात वैयक्तिक व सांघिक अशा दोन कास्यपदकांची कमाई. राष्ट्रकुल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा मराठवाड्याचा पहिला खेळाडू. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणारा मराठवाड्याचा दुसरा खेळाडू. याआधी दुर्गेश जहागीरदार याने गतवर्षी थायलंड येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
२०१८ : दुबई येथे झालेल्या ज्युनिअर एशियन व कॅडेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व.
२०१७ : नालगोंडा येथील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत रौप्य.
२०१७ : करीमनगर येथे ६२ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत रौप्य.
२०११ ते २०१८ : यादरम्यान झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कास्यपदकांची कमाई.