आता औरंगाबादेतून वस्त्र उद्योग वळवला, टेक्सटाईल पार्क अमरावतीकडे नेण्याच्या हालचाली

By विकास राऊत | Published: November 3, 2022 01:14 PM2022-11-03T13:14:09+5:302022-11-03T13:15:09+5:30

केंद्रशासनाच्या थेट गुंतवणुकीवर गदा येण्याची शक्यता

Now textile industry fled from Aurangabad, moves to move textile park to Amravati | आता औरंगाबादेतून वस्त्र उद्योग वळवला, टेक्सटाईल पार्क अमरावतीकडे नेण्याच्या हालचाली

आता औरंगाबादेतून वस्त्र उद्योग वळवला, टेक्सटाईल पार्क अमरावतीकडे नेण्याच्या हालचाली

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद :
राज्यात उद्योगांच्या पळवा - पळवीवरून रणकंदन सुरू असतानाच केंद्र शासनाच्या पीएम मित्र योजनेअंतर्गत टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या प्रस्तावातून औरंगाबादला वाटाण्याच्या अक्षता मिळण्याची शक्यता आहे. औरंगाबाद व अमरावती या दोन विभागांपैकी एका ठिकाणी पार्क आणण्याचा प्रस्ताव होता. पार्क अमरावतीकडे नेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

उद्योगांच्या पळवा - पळवीत औरंगाबादची कायम पिछेहाट होत आली आहे. आजवर किया मोटार्सपासून इतर १३ मोठे उद्योग ऑरिकमध्ये येणार, अशी अपेक्षा असणारे अनेक उद्योग इतरत्र गेले आहेत. पीएम मित्र योजनेअंतर्गत शेंद्रा - बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कअंतर्गत ऑरिकमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिला होता. एक हजार एकर जागेत स्थापन होणाऱ्या या प्रकल्पातून सुमारे १ लाख लोकांना थेट रोजगार मिळणार होता, तर २ लाख जणांना अप्रत्यक्ष राेजगार उपलब्ध झाला असता. १३ राज्यातून या पार्कसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव गेले होते. त्यापैकी ७ ठिकाणांचा विचार झाला हाेता.

मराठवाड्याची कापूस निर्यात क्षमता
मराठवाड्यातून सुमारे एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्के कापूस निर्यात करण्याची क्षमता आहे. देशातील २७ जिल्ह्यात येथून कापूस जातो. ५०० जिनिंग प्रेसिंग उद्योग विभागात आहेत. येथे उपलब्ध असलेली जागा, दळववळण, कुशल मनुष्यबळाबाबत शासनाकडे सादरीकरण करण्यात आले होते. ४ लाख हेक्टरवरील कापूस निर्यातक्षम आहे.

यंदा १३ लाख हेक्टरवर कापूस
मराठवाड्यात २०२२ - २३च्या खरीप हंगामात १३ लाख ७१ हजार ४९३ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली. एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत २९ टक्के हे प्रमाण आहे. अतिवृष्टीमुळे यातील सुमारे ५० टक्के पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचा अंदाज आहे. विभागातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात कापूस विकावा लागतो. यासाठी वाहतूक, मजुरीमुळे नफा - तोट्याचे गणित चुकते. त्यामुळे टेक्सटाईल पार्कची केंद्र शासनाची ४९ व राज्य शासनाची ५१ टक्के गुंतवणूक औरंगाबादेत आल्यास १३ लाख ७१ हजार ४९३ हेक्टरवरील पीक येथेच विकण्याची सोय होऊ शकते.

एआयटीएलचे एमडींचे कानावर हात
औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊन लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, अमरावतीत टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याप्रकरणी काही माहिती नाही. परंतु तसा काही निर्णय झाला असेल तरी औरंगाबादला दुसऱ्या टप्प्यात पार्कसाठी गुंतवणूक येईलच. औरंगाबाद व अमरावती असे दोन प्रस्ताव होते. बजेटनुसार फेसवाईज गुंतवणुकीचे निर्णय होत असतात.

Web Title: Now textile industry fled from Aurangabad, moves to move textile park to Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.