आता बारावीच्या परीक्षेत घोटाळा; चारशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर जुळेना

By विजय सरवदे | Published: May 10, 2023 03:34 PM2023-05-10T15:34:25+5:302023-05-10T15:38:25+5:30

कॉपीमुक्त परीक्षेचे फज्जा; परीक्षा एकाची अन् उत्तरे मात्र दुसऱ्यानेच दिली लिहून

Now the 12th exam scam; The signatures in the answer sheets of four hundred students do not match | आता बारावीच्या परीक्षेत घोटाळा; चारशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर जुळेना

आता बारावीच्या परीक्षेत घोटाळा; चारशे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर जुळेना

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : कॉपीमुक्त परीक्षेची टिमकी बजावणाऱ्या बोर्डाचे पितळ उघडे पडले आहे. बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचेच हस्ताक्षर असल्याचे आढळून आल्यामुळे विभागीय शिक्षण मंडळ हादरून गेले असून, मंगळवारपासून शिक्षण मंडळाने संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची यापूर्वीच विभागीय शिक्षण मंडळात चौकशी झाली. यात दहावीच्या २९ आणि बारावीच्या १०२ कॉपी केसेसमध्ये विद्यार्थी त्यांचे पालक आणि गरज पडलेल्या प्रकरणात केंद्रावरील पर्यवेक्षकांची समितीसमोर सुनावणी झाली.
मंगळवारी, ९ मेपासून बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत काही प्रश्नांच्या उत्तरात हस्ताक्षर बदल असलेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशीसाठी बोलाविले होते. यासंदर्भात मॉडरेटरकडून या घटनेबाबत बोर्डाला अहवाल प्राप्त झाला असून, भौतिकशास्त्र विषयाच्याच उत्तरपत्रिकेत हा प्रकार घडला आहे, हे विशेष. दुसरीकडे, बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत सुमारे चारशेहून अधिक उत्तरपत्रिकांत हा प्रकार घडला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे डोके चक्रावले आहे.

तो मी नव्हेच!
ही चौकशी आजपासून १२ मेपर्यंत चालणार आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. चौकशीसाठी बोर्डात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. चौकशी समितीने विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेत काही उत्तरांत हस्तक्षर बदल कसा झाला, कोणी उत्तरे लिहिली, मास कॉपी झाली का, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. पण, हा सारा प्रकार आमच्या अपरोक्ष झाला आहे. आमच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याने कोणी व का लिहिले, यामुळे आम्हालाच आश्चर्य वाटत आहे, असा खुलासा अनेक विद्यार्थ्यांनी केला.

गरज पडली तर केंद्रप्रमुखांचीही चौकशी
यासंदर्भात विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले की, फक्त बारावी परीक्षेत फक्त भौतिकशास्त्र विषयातच हा गंभीर प्रकार घडल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. १२ मेपर्यंत दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची चौकशी होईल. विद्यार्थ्यांकडून लेखी म्हणणे घेतले आहे. गरज पडली तर संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येईल. बोर्डाच्या नियमावलीनुसार यासंदर्भात शिक्षेचा निर्णय घेतला जाईल.

Web Title: Now the 12th exam scam; The signatures in the answer sheets of four hundred students do not match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.