आता महापालिका देणार ९,५०० गुणांची स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षा; पण तयारी किती झाली?
By मुजीब देवणीकर | Published: April 17, 2023 12:32 PM2023-04-17T12:32:38+5:302023-04-17T12:33:12+5:30
स्वच्छ सर्वेक्षणात दरवर्षी शहराच्या रँकिंगमध्ये घसरण होत आहे
छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ भारत अभियानात स्वच्छता सर्वेक्षणात दरवर्षी छत्रपती संभाजीनगर शहराची रँकिंगमध्ये सुधारणा होण्याऐवजी घसरण होत आहे. यंदा ९,५०० गुणांसाठी स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेसाठी मनपाकडून कोणतीही खास तयारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही शहराची रँकिंग आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र शासनाने २०२२-२३ या वर्षाच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी सहा महिन्यांपूर्वीच गाइडलाइनची घोषणा केली. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ७,५०० गुणांचे होते. यंदा आणखी दोन हजार गुणांची वाढ झाली आहे. यंदाचे सर्वेक्षण चार प्रकारांत केले जाणार आहे. केंद्रीय पथकाकडून नागरिकांचा फिडबॅक पहिल्या टप्प्यातच घेतला जाणार आहे. जनजागृतीबाबत मनपा प्रशासनाने कोणतीही तयारी केलेली नाही. महापालिकेने घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. मात्र, येथून पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. हर्सूलचा प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. नारेगाव कचरा डेपोतील कचरा नष्ट करण्यात आलेला नाही. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा प्रश्न कायम आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने जशी साफसफाई ठेवण्यात येत होती, तशी अजिबात दिसून येत नाही. या सर्व नकारार्थी बाबी छत्रपती संभाजीनगर शहराची रँकिंग घसरण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक
नवी मुंबई, पुणे, नागपूर महापालिकांनी २०२३ च्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना, जनजागृती उपक्रम व स्पर्धा, कचरा वर्गीकरणावर नोव्हेंबर २०२२ पासूनच कार्यवाही सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर पालिकेत मात्र कचरा वर्गीकरणाविषयी पूर्वीच्या तुलनेत आणखी घसरण झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी ६० टक्के वॉर्डात कचऱ्याचे वर्गीकरण केले जात होते, याचे प्रमाण आता बोटांवर मोजण्याइतक्याच वॉर्डात दिसून येते.
गतवर्षी रँकिंग ३०
२०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ सर्वेक्षणाच्या रँकिंगमध्ये देशपातळीवर ३०व्या स्थानी होते. तर राज्य पातळीवर दहा शहरांत नवव्या क्रमांकावर होते. २०२१ मध्ये देशपातळीवर २२ व्या, तर राज्यात सहाव्या क्रमांकावर होते. यावेळी मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष पाहता रँकिंगमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
चार टप्प्यांत होणार सर्वेक्षण
- नागरी सेवा व त्यांचा विकास : ४,५२५ गुण
- स्वच्छताविषयक कागदपत्रे : २,५०० गुण
- नागरिकांचा फिडबॅक : २,४७५ गुण.