आता गुन्हेगारांवर बसेल वचक, जिल्ह्यातील ११३ गावांवर २ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच
By सुमित डोळे | Published: October 21, 2023 12:44 PM2023-10-21T12:44:33+5:302023-10-21T12:45:24+5:30
पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या प्रयत्नांना यश, दाेन महिन्यांत गावे झाली सतर्क
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये ७३४ ठिकाणी २ हजार ७८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात गावांचे अंतर्गत रस्ते, तालुक्याचे प्रमुख मार्ग, धार्मिक स्थळांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी ‘एक सीसीटीव्ही गावासाठी’ हा उपक्रम हाती घेतला होता. सलग एक महिना कलवानीया यांनी मान्यवर, तरुणांशी चर्चा केली. त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यासाठी पुढाकार घेतलेल्या नागरिक, ग्रामस्थांचा शुक्रवारी अधीक्षक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ही माहिती समोर आली.
कुठल्याही शासकीय यंत्रणेपेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे चोवीस तास, १२ महिने अहोरात्र सक्रिय असतात. भक्कम पुरावाही देतात. विशेष म्हणजे ते नि:पक्ष असतात. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे हे सुजाण समाजाचे लक्षण आहे. गाव, तालुका पातळीवर आता वाढदिवस, उत्सवामध्ये प्रत्येकाने एक तरी सीसीटीव्ही कॅमेरा गावाला देण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविषयी अपेक्षित जनजागृती नव्हती. ग्रामीण भागातील मिरवणुका, गावातील वाद, विनयभंगासारख्या घटनांमध्ये अनेकदा आरोपी निसटतात. पुराव्याअभावी गुन्हा सिद्ध करण्यात अडचणी येतात. बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्याप्ती मर्यादित हाेती. त्यामुळे चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. गावांमध्ये पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविषयी जनजागृती झाली. टवाळखोर, समाजकंटकांमध्ये याचा योग्य संदेश जाईल, असे प्रतिपादन अतिरिक्त अधीक्षक सुनील लांजेवार यांनी केले. यावेळी उपअधीक्षक महेक स्वामी, उपअधीक्षक जयदत्त भवर, दिनेश कोल्हे, पूजा नांगरे यांची उपस्थिती होती.
गुन्हा करण्याआधी गुन्हेगार घाबरेल
प्रत्येक ठिकाणी पोलिसांना पोहोचणे शक्य होत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे पाहून अनेक अनुचित प्रकार घडण्यापासून टळतात. कॅमेरे पाहूनच विनयभंग, वाद, हाणामारी, लूटमार, धार्मिक प्रकरणांत गुन्हा करण्याआधीच गुन्हेगार घाबरतो. गुन्हेगारीला आळा बसून गावे सुरक्षित होतील. हे सुरक्षेचे कवच चिरकाल टिकणारे असेल, असे प्रतिपादन कलवानीया यांनी केले. एखाद्या प्रकरणात पोलिसांना फुटेज हवे असेल तरी कोणालाही त्रास न देता ते घेतले जाईल, असे आश्वासनदेखील त्यांनी ग्रामस्थांना दिले.