आता पदवी अभ्यासक्रम असेल ४ वर्षांचा; येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी
By योगेश पायघन | Published: December 9, 2022 11:55 AM2022-12-09T11:55:09+5:302022-12-09T11:55:15+5:30
चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमास प्रवेश आणि बाहेर पडण्याची लवचिकता असेल.
- योगेश पायघन
औरंगाबाद : नव्या शैक्षणिक धोरणातील शैक्षणिक श्रेयांक पेढी, चाॅइस बेस क्रेडिट सिस्टम, मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट, मातृभाषेत परीक्षा देण्याची सुविधा यांच्या अंमलबजावणीनंतर आता तीन वर्षांत मिळणाऱ्या पदवीसाठी चार वर्षे लागणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार आहे.
सध्या सुरू असलेला ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ४ वर्षांत स्थलांतरित करणे, एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम, विधायक अध्यापनशास्त्राचा वापर, विद्यार्थिभिमुख शिक्षण आराखडा याबाबत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. राजेंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ समितीच्या निर्देशांची २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात अंमलबजावणीसंदर्भात मंगळवारी शासन आदेश जारी केला. उच्च शिक्षण विभागाच्या या आदेशात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये (एनसीआरएफ) सर्व प्रमाणपत्र, पदविका, पदवी एकापेक्षा जास्त प्रवेश आणि निर्गमन पर्यायांसह, राज्य विद्यापीठे राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्कचा संदर्भ घेतील. यात राष्ट्रीय उच्च शैक्षणिक पात्रता फ्रेमवर्क, राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क आणि राष्ट्रीय शालेय शिक्षण पात्रता फ्रेमवर्कचा समावेश आहे. नव्या शैक्षणिक धोरणासंबंधी आवश्यक कायदे, अध्यादेश व नियम तयार करण्याचे आदेशही सर्व विद्यापीठाला कुलपतींनी दिले आहेत.
पदवीमध्ये प्रवेश, बाहेर पडण्याची लवचिकता
चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रमास प्रवेश आणि बाहेर पडण्याची लवचिकता असेल. विविध स्तरांवर प्रवेश आणि निर्गम पर्यायांसह चार आणि पाच वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदव्युत्तर पदवी कार्यक्रमांच्या रचनेविषयी स्पष्टता निर्देशात आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १ वर्षाच्या यूजी प्रमाणपत्रासाठी किमान ४० क्रेडिट्स, दोन वर्षांनंतर यूजी डिप्लोमासाठी किमान ८० क्रेडिट्स, तीन वर्षांच्या पदवीसाठी किमान १२० क्रेडिट्स, संशोधन किंवा ऑनर्ससह पदवी चार वर्षांसाठी किमान १६० क्रेडिट्सची आवश्यकता असेल. यासंबंधी सविस्तर निर्देश उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिले आहेत.
सर्वच अभ्यासक्रम ४ वर्षांचे
नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात यूजीसीने गाइडलाइन्स दिल्या आहे. कला, विज्ञान, वाणिज्य शाखेची पदवी अभ्यासक्रम पुढील वर्षांपासून ४ वर्षांचे करण्यासंदर्भात पावले उचलत आहोत. पुढील वर्षांपासून सर्वच पदवी अभ्यासक्रम ४ वर्षांचे असतील.
- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद