आता चार वॉर्डांच्या प्रभागाची चर्चा; सर्वच इच्छुक उमेदवार आणखी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:27 PM2022-08-02T12:27:57+5:302022-08-02T12:30:26+5:30

चार दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे चार वॉर्डांचा प्रभाग करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

Now the discussion of the four wards starts in Aurangabad Municipal Election; All interested candidates are confused | आता चार वॉर्डांच्या प्रभागाची चर्चा; सर्वच इच्छुक उमेदवार आणखी हवालदिल

आता चार वॉर्डांच्या प्रभागाची चर्चा; सर्वच इच्छुक उमेदवार आणखी हवालदिल

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी दि. ५ ऑगस्ट रोजी प्रभाग आरक्षण काढले जाणार आहे. त्यापूर्वीच चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली. त्यामुळे इच्छुकांचे अवसान आणखी गळून पडत आहे. तीन वॉर्डांच्या प्रभागाची हद्द पाहून अनेकांना चक्कर येत आहे. त्यात चार वॉर्डांचा प्रभाग म्हणजे काय अवस्था होईल, असा विचार करून अनेकजण गर्भगळीत होत आहेत.

चार दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे चार वॉर्डांचा प्रभाग करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे नवीन चर्चेला बळ मिळत आहे. बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारने महापालिकांमधील वाढविलेली सदस्य संख्याही चुकीचे असल्याचे नमूद केले. हा निर्णय नियमाला अनुसरून नसल्याचे म्हटले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या पोटाळ गोळा उठला आहे.

मागील अडीच वर्षांपासून इच्छुक उमेदवार निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. निवडणूक आयोगाने अलीकडेच औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी तीन वॉर्डांची प्रभाग रचना अंतिम केली. दि. ५ ऑगस्ट रोजी आरक्षणही काढण्यात येणार आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील, असा सर्वच राजकीय मंडळींचा कयास आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुक उमेदवारांनी मागील महिनाभरापासून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. त्यातच आता पुन्हा नव्याने प्रभागरचना होणार का? या भीतीने इच्छुक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे काही स्थानिक कार्यकर्तेही चार वॉर्डांचाच प्रभाग होणार यावर भर देताना दिसून आले.

मतदार याद्यांचे काम सुरू
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनपातील निवडणूक विभागाने प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन प्रभागानुसार मतदार याद्या तयार करायच्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामासाठी घेण्यात आले आहेत, असे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले.

Web Title: Now the discussion of the four wards starts in Aurangabad Municipal Election; All interested candidates are confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.