आता फक्त बँकेत प्रवेशावर चार्ज लावणे बाकी; १५० पेक्षा अधिक सेवाशुल्काचा खातेदारांना भुर्दंड
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 9, 2023 12:01 PM2023-12-09T12:01:05+5:302023-12-09T12:02:39+5:30
बँकेत रक्कम ठेवावी की नाही, सर्वसामान्यांना पडला प्रश्न
छत्रपती संभाजीनगर : घरात पै-पैसा ठेवला तर चोरीची भीती, पतसंस्थेत ठेवले तर ती बुडण्याची भीती, राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवले तर विविध सेवाशुल्काच्या नावाखाली त्यातील रक्कम कपातीची भीती मग रक्कम ठेवावी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य खातेदारांना पडला आहे. रोख रक्कम मोजण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत अशा १५० पेक्षा अधिक सेवाशुल्काचा आजघडीला ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. सेवाशुल्कांबाबत अनभिज्ञ असल्याने ती रक्कम ग्राहकांच्या खात्यातून परस्पर कपात केली जात असल्याने याचा मन:स्तापही वाढला आहे.
कोणत्या व्यवहारावर बँकेचे किती चार्जेस लागतात (प्रत्येक बँकेची सेवाशुल्क आकारण्याची रक्कम वेगवेगळी आहे)
१) कमीत कमी बॅलेन्स न ठेवल्यास :
अ) ० ते ५०० रुपये ---- ७५ रुपये (प्रति महिना)
ब) ५०० ते १००० रुपये--- ५६ रुपये (प्रति महिना)
क़) १००० ते २०००रुपये---५६रुपये (प्रति महिना)
२) डुप्लिकेट पासबुकसाठी :
बचत खाते : १०० रुपये मागील २५ एंट्री पाहिजे असले तर : ७५ रुपये
चालू खात्यात : मागील २५ एंट्री पाहिजे असेल तर : १०० रुपये
३) फिक्स डिपॉझिट डुप्लिकेट पावतीसाठी : १०० रुपये
४) बचत खाते चेकबुक : पहिले २० चेक मोफत
त्यानंतरच्या चेकबुकला १००रुपये सेवाशुल्क.
चालू खाते आणि सीसीला : ५० चेक २५० रुपये.
५) चेक रिटर्न आल्यास :
३ वेळा झाल्यास प्रत्येकी ५०० रुपये, चौथ्यांदा व त्यापुढे रिर्टन आल्यास प्रत्येकी १ हजार रुपये
६) स्टॉप पेमेंट : बचत खात्याला : २०० रु.; चालू खात्याला : ३०० रु.
७) चालू खात्यात लाखो रुपये ठेवण्यावर सेवाशुल्क :
अ) १ लाख रुपये खात्यात असले तर : २०० रु.
ब) १ लाख ते २ लाख असेल तर : १५० रु.
क) २ लाख ते ५ लाखांपर्यंत रक्कम : १०० रु.
८) रोख रक्कम खात्यात भरण्यासाठी सेवाशुल्क
अ) ५० हजारांपर्यंतची रोख खात्यात भरली तर सेवाशुल्क नाही.
ब) ५० हजारांवर १ रुपया जास्त भरला तरी १०० रुपये सेवाशुल्क.
क़) ५१ हजार रुपये रोख भरल्यासही १०० रुपये सेवाशुल्क.
ड) ५० लाख रोख भरल्यास १० हजार रुपये सेवाशुल्क.
९) एसएमएस अलर्ट :
अ) बचत खाते १५ रुपये (३ महिने)
ब) चालू खाते २५ रुपये (प्रत्येक महिना)
१०) नॉमिनेशन बदलण्यासाठी : १०० रुपये
११) पत्ता किंवा मोबाइल नंबर बदलण्यासाठी : १५० रुपये.
१२) एका वर्षाच्या आत अकाउंट बंद करायचे तर : ५०० रुपये
१३) एटीएम कार्ड घेतले : ३०० रुपये
पहिले हरविले, दुसरे एटीएम कार्ड घेतले : २०० रुपये
१४) एटीएम वार्षिक देखभाल :
पहिल्या वर्षी मोफत, दुसऱ्या वर्षापासून २०० रुपये.
१५) नवीन पिन नंबर जोडण्यासाठी : ५० रुपये.
१६) एटीएम कार्डची मर्यादा वाढविण्यासाठी : ५० रुपये
१७) खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून ५ ट्रांझेक्शन मोफत
नंतरच्या प्रत्येक ट्रांझॅक्शनला २१ रुपये.
१८) दुसऱ्या बँकेच्या एटीएममधील प्रत्येक ट्रांझेक्शनला २१ रुपये.
१९) लॉकरचे वार्षिक भाडे :
‘ए’ ग्रेड : १२००- १८००रु
‘ब’ग्रेड : १२०० ते २ हजार रु
‘सी’ग्रेड : २४०० ते ३६०० रु
‘डी’ग्रेड : २४००रु
२०) घरपोच बँक सुविधा सर्वांत भयंकर चार्जेस
१) घरपोच बँकेचा प्रत्येक सेवेला : ७५ रुपये चार्जेस
२) २ लाख ते २ कोटीपर्यंत रक्कम : जीएसटीसह ४६७५ रु ते ६३१२५ रु.
एक व्यापाऱ्याच्या चालू खात्यात किती लागतात चार्जेस?
१) लेझर फोलिओ चार्जेसच्या नावाखाली : २३६ रुपये (दर तीन महिन्याला)
२) ५ हजार खाली बॅलन्स असल्यास : ९४४ रुपये (दर महिन्याला)
डिपॉझिटवर ४० प्रकारचे वेगवेगळे चार्जेस आकारले जातात.
३२ हजार जमा झाले; बँकेने केले २३ हजार कपात
शहरातील एका व्यापाऱ्याने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडले होते. वर्षभरापेक्षा अधिककाळ त्याने त्या खात्यात व्यवहारच केला नाही. बँकेत रक्कमही त्याने ठेवली नव्हती. ऑनलाइन व्यवहारात त्यांच्या खात्यात ३२ हजार रुपये जमा झाले आणि बँकेने लगेच त्यातील विविध चार्जेसपोटी २३ हजार रुपये कपात केली. या प्रकरणावर आम्ही अभ्यास करीत आहोत व लवकरच केंद्रीय अर्थराज्य मंत्रीकडे त्यासंदर्भात तक्रार करणार आहोत. एका व्यापाऱ्याचे नव्हे अनेक व्यापाऱ्यांच्या अशा तक्रारी आहे.
-अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट
चार्जेस आकारा; पण एकसमान
विविध व्यवहारांवर चार्जेस आकारणे बँकांनी बंद केले पाहिजे. कारण, ग्राहकांकडून बेलगाम चार्जेस आकारून बँका आपला नफा वाढवित आहेत. वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे चार्जेस आहेत. यासंदर्भात कोणत्याही बँकेत ताळमेळ नाही. चार्जेस आकारले तर सर्व बँकांनी एकसमान चार्जेस आकारावे.
-संतोष कावले-पाटील, अध्यक्ष, कॅट
रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला पाहिजे
बँका सेवाशुल्कच्या नावाखाली सर्वसामान्य खातेदारांना लूटत आहेत. बँकेच्या प्रत्येक व्यवहारावर सेवाकर आकारला जात आहे. अतिरिक्त चार्जेस लावले जात आहे. त्यावर पुन्हा १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक बँकेचे चार्जेस आकारण्याची रक्कम वेगवेगळी आहे. यावर कुठे तरी बंधन आणले पाहिजे. रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून एकसमान चार्जेस आकारण्यासंदर्भात सर्व बँकांना नोटीस काढावी.
-देवीदास तुळजापूरकर, महासचिव, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज फेडरेशन
सेवा करासंदर्भात २६ पानांचे परिपत्रक
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोण कोणत्या व्यवहारावर किती सेवाकर आकारला जावा, याचे २६ पानांचे परिपत्रक काढले आहे. अव्वाचे सव्वा ‘सेवाकर’ खातेदारांकडून आकारला जात आहे. यासंदर्भात ऑल इंडिया बँक एम्प्लाॅईज असोसिएशनने सरकार व रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली आहे की, खातेदारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ‘सेवाकर’ कमी करण्यात यावा.
खातेदाराला माहितीच नाही, किती रक्कम कपात होतेय
आता पगारापेक्षा खर्च वाढला, विशेषत: महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बँकेत कमी रक्कम राहते. अशावेळीस बँका कमी बॅलन्स म्हणून रक्कम कपात करतात. एटीएमवरून रक्कम काढली तरी त्यावर चार्जेस लावला जातो. अनेकदा बँकेत जाऊन पासबुक प्रिंट करणे जमत नाही. तसेच एसएमएस अलर्टही बघितला जात नाही. यामुळे बँक दरमहिन्याला किती रक्कम आपल्या खात्यातून कपात करते हेच लक्षात येत नाही.
-मिलिंद देशपांडे, खातेदार