आता पोलिसांची सटकली; छत्रपती संभाजीनगरात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 12:31 PM2023-04-10T12:31:49+5:302023-04-10T12:32:21+5:30
सोशल मीडियात काहीजण दोन समाजांत वाद निर्माण होतील, अशा पद्धतीच्या पोस्ट करत आहेत
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियात दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या दोघांच्या विरोधात जवाहरनगर, बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सईद आयाज अहेमद या तरुणाने ८ एप्रिलला सकाळी फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केला. हा प्रकार राजकीय पदाधिकारी शेखर जाधव यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून सईद आयाज अहेमद याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. दुसरी घटना बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सोनू पोळ या व्यक्तीने फेसबुकवरील स्वराज्य ग्रुपवर मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा प्रकार १२ मार्च, २ एप्रिलला सायबर पोलिसांच्या निदर्शनास आला होता. पोलिस अंमलदार गोकुळ कुतरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोळच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करत आहेत.
..तर गुन्हा दाखल होईल
सोशल मीडियात काहीजण दोन समाजांत वाद निर्माण होतील, अशा पद्धतीच्या पोस्ट करत आहेत. अशा पोस्ट करणाऱ्यांच्या कृतीवर शहर पोलिस बारीक लक्ष ठेवून आहेत. दोन समाजांत तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्यास संबंधितांवर माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. प्रत्येक व्यक्तीने शांतता कायम ठेवण्यासाठी समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
- डॉ. निखिल गुप्ता, पोलिस आयुक्त
ॲडमिनकडून पाच पोस्ट
बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सोनू पोळ हा फेसबुकवरील एका ग्रुपचा ॲडमिन आहे. त्याने एका समाजाविषयी तब्बल पाच वेळा आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सायबरच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.
सायबर पोलिसांची टीम कार्यरत
दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलिसांची एक स्वतंत्र टीमच कार्यरत आहे. त्याशिवाय प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरातील सोशल मीडियाचे ग्रुप, खबऱ्यांनाही वादग्रस्त पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणतीही पोस्ट आढळून आल्यास तात्काळ गुन्हे नोंदविण्याचे आदेशही पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिले आहेत.