आता अगरबत्तीतून निघतोय महागाईचा धूर; किंमत वाढविण्याऐवजी संख्या घटवली
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 29, 2022 07:42 PM2022-07-29T19:42:33+5:302022-07-29T19:45:07+5:30
भाववाढीमुळे व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही अगरबत्ती उत्पादकांनी किमती वाढविण्याऐवजी पुड्यातील अगरबत्तीची संख्या कमी केली.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : श्रावणाला सुरुवात होत असताना देवासमोर लावण्यात येणाऱ्या अगरबत्तीतून सुगंधाऐवजी महागाईचा धूर निघत आहे. कारण, अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरले जाते त्या केमिकल व अन्य कच्चामालाचे भाव वाढले आहेत. याचा हा परिणाम आहे. जास्त पैसे मोजावे लागत असल्याने अगरबत्तीचा सुगंध नागरिकांसाठी महागाईचा धूर बनला आहे.
तसे वर्षभर अगरबत्तीची विक्री होत असते. देवघरात सकाळ-संध्याकाळ अगरबत्ती लावली जाते तसेच मंदिर, दुकानात अगरबत्ती लावली जाते. अगरबत्ती लावल्यावर सर्वत्र सुगंध पसरतो. हा सुगंधच ग्राहकांना अगरबत्ती खरेदीच्या मोहात टाकतो.
अगरबत्ती पुड्याच्या भावात किती वाढ झाली
ग्रॅम (वजन) जून जुुलै
१) १५ ग्रॅम ५ रु. - ७ रु.
२) ३० ग्रॅम १०रु. - १२ रु.
३) १०० ग्रॅम ५० रु.- ६० रु.
४) २२५ ग्रॅम २००रु.- २२० रु.
किमती त्याच ठेवल्या अगरबत्ती संख्या घटवली
भाववाढीमुळे व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही अगरबत्ती उत्पादकांनी किमती वाढविण्याऐवजी पुड्यातील अगरबत्तीची संख्या कमी केली. जो अगरबत्ती पुडा आधी १५० ग्रॅम वजनाचा होता तो आता १२० ग्रॅम वजनाचा करण्यात आला असून त्याची किंमत ७० रुपये स्थिर ठेवण्यात आली. १०० ग्रॅमचा पुडा ८५ ग्रॅम करण्यात आला व त्याची किंमत ६० ते ७० रुपये दरम्यान स्थिर ठेवली.
दररोज १० लाखांची उलाढाल
शहरात वर्षभर अगरबत्ती विकली जाते. त्यात श्रावणापासून ते दिवाळीपर्यंत दररोज अगरबत्तीच्या विक्रीची सुमारे १० लाखांची उलाढाल होते.
का महागली अगरबत्ती
अगरबत्ती तयार करण्यासाठी डिपिंग ऑईल वापरले जाते. आधी या ऑईलची किंमत १४० ते १५० रुपये प्रतिलिटर होती. ती वाढून आता २०० ते २१० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. अगरबत्तीसाठी लागणारे लाकूड विदेशातून येते. त्याचेही भाव वाढले. एकूणच कच्चामालाचे भाव वाढल्याने अगरबत्तीच्या किमतीवरही परिणाम झाला.
कच्चा मालावरील जीएसटीत ७ टक्क्यांची वाढ
अगरबत्तीवर ५ टक्केच जीएसटी आकारला जातो. मात्र, अगरबत्तीसाठी लागणाऱ्या रसायनावर पूर्वी ५ टक्के जीएसटी होता तो वाढून १२ टक्क्यांपर्यंंत पोहचला आहे. ७ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा परिणाम अगरबत्ती तयार करण्यावर झाला.
- अनिलकुमार भंडारी, अगरबत्ती वितरक