तुमच्या लाडक्या टॉमी, मोतीचा काढा आता 'थर्ड पार्टी विमा'; आजार, हरविल्यास मिळते भरपाई
By प्रशांत तेलवाडकर | Published: February 14, 2024 11:36 AM2024-02-14T11:36:11+5:302024-02-14T11:36:33+5:30
आता लाडक्या श्वानालाही विम्याचे संरक्षण दिली जात असल्याने ही आधुनिक ‘भूतदया’ होय.
छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील रहिवासी विजय वर्मा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे सोनेरी रंगाचे ‘लॅब्राडोर’ जातीचे ‘टॉमी’ नावाचे लाडके श्वान आहे. नुकताच वर्मांनी आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा काढला. त्यांना तेव्हा कळाले की, ‘टॉमी’चाही विमा काढता येतो. त्यांनी लगेच कागदपत्रांची पूर्तता करून त्याचाही विमा काढला.
श्वानांचाही ‘आरोग्य विमा’ आता उतरविला जात आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण आता लाडक्या ‘टॉमी’लाही विम्याचे संरक्षण दिली जात असल्याने ही आधुनिक ‘भूतदया’ होय. त्याच्यावर घरातील सर्व सदस्य जिवापाड प्रेम करतात.
पीईटी डॉग इन्शुरन्स पॉलिसी
पाळीव प्राण्यांसाठी विविध कंपन्यांच्या विमा पॉलिसी आहेत. ‘पीईटी डॉग इन्शुरन्स पॉलिसी’ म्हणून त्यांना नाव देण्यात आले आहे. श्वानांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यांच्या खाण्यावर, देखभालीवर मोठा खर्च केला जातो. तो आजारी पडू शकतो. त्यावर उपचार, शस्त्रक्रिया होऊ शकते. तो हरवू शकतो. अशावेळी पॉलिसी कामाला येते.
... मिळते विम्याची रक्कम
विमा काढलेला श्वान आजारी पडला, त्याचा अपघात झाला. शस्त्रक्रिया झाली, तो चोरीला गेला, तर त्याची भरपाई श्वानमालकाला मिळते. श्वानाचा मृत्यू झाल्यावर त्यास दफन करण्यासाठी लागणारी रक्कम मिळते.
थर्ड पार्टी लॅबिलिटी
वाहनांचा अपघात झाला तर थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळतो तसेच पाळीव श्वानाने बाहेरील व्यक्तीला किंवा लहान मुलावर हल्ला केला. चावलेल्यास रेबीज झाला, उपचारासाठी लागणारा खर्च किंवा ती व्यक्ती दगावली तर श्वान मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. श्वानाचा विमा काढलेला असेल तर ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ने समोरील व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळू शकते.
किती असतो विमा ?
१) बाजारात श्वान विकले जातात, त्याची किंमत विमा कंपनी ग्राह्य धरत नाही.
२) देशी श्वानापासून ते विदेशी श्वानांपर्यंत सर्वांची किंमत विमा कंपनीने ठरविते.
३) विमा हप्त्याची रक्कम ही पाळीव प्राण्याचा प्रकार, वय, जात यानुसार किती प्रकारच्या रकमेचे संरक्षण हवे आहे. यावर ठरविली जाऊ शकते.
४) श्वानांचा विमा १ वर्षापासून १० वर्षांपर्यंतचा निघतो.
५) उदा. २ वर्षाच्या डॉबरमॅनची किंमत कंपनीने ६० हजार ठरविलेली आहे. त्यास वार्षिक विमा साडेसात ते ८ हजार रुपयांत काढला जातो.
आजाराचा समावेश होत नाही
विमा कोणत्या परिस्थितीत मिळत नाही? गरोदरपणा हा आजार नसतो, मादी श्वानाच्या गरोदरपणाचा खर्च किंवा आजार झाला तर विमा रक्कम मिळत नाही. काहीजण मादी श्वान आणून तिच्याकडून होणारी पिल्ले विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे याचा विमा काढला जात नाही. पॉलिसी काढण्याआधी श्वानाला काही आजार असेल तर त्याचा विम्यात समावेश होत नाही.
- प्रदीप सोनटक्के, टीम लीडर (विमा कंपनी)