आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:35 PM2019-04-03T23:35:08+5:302019-04-03T23:35:35+5:30
लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे. या वेळेत मतदान केंद्रांवर मतदारांना सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले.
मतदान प्रक्रियेसाठी पूर्वी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान घेण्यात येत होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्यासाठी आयोगाने वेळ बदलली आहे. उन्हामुळे दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का घसरतो. त्यामुळे सकाळी अर्धा तास आणि सायंकाळच्या टप्प्यात एक तास वाढविण्यात आला आहे.
आयोगाने मतदानाच्या वेळात दीड तास वाढ केल्याने निश्चितच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. उन्हाचा पारा चढत असल्यामुळे मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आल्याचे दिसते. प्रशासन तांत्रिक कारणे सांगत असले तरी उन्हामुळे मतदान कमी होऊ नये, यासाठीच आयोगाने वेळ वाढविल्याचे स्पष्ट होते.
१२२ मतदान केंद्रांचे स्थलांतर
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी शेडस् करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक उपचाराच्या सुविधेसह चार मतदान केंद्रांसाठी एक आरोग्य पथक तैनात असेल. जिल्ह्यात तीन हजारांच्या आसपास मतदान केंद्रे आहेत. १२२ ठिकाणच्या इमारती जीर्ण असल्यामुळे त्यांची कामे सुरू असल्याने ती इतरत्र स्थलांतरित करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रींगी यांनी सांगितले.