आता वॉर्डनिहाय जाहीरनामाही लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:43 AM2017-11-02T00:43:39+5:302017-11-02T00:43:45+5:30
महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
नांदेड महापालिकेत महापौरपदी काँग्रेसच्या शीलाताई भवरे व उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाल्यानंतर खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत या दोन्ही पदाधिकाºयांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर शहरातील विकासकामासंदर्भात खा. चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शहरातील प्रमुख समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातीलच. इतकेच नव्हे, तर मी स्वत: एखाद्या प्रभागास भेट देवून तेथील समस्यांची माहिती घेणार आहे.
त्यानंतर याच पद्धतीने संपूर्ण वॉर्डा-वॉर्डातील समस्या जाणून घेतल्या जातील. त्या सोडवण्यासाठी वॉर्डनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करुन प्रश्न सोडविण्याचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. शहराचा पाच वर्षांचा विकास आराखडाही तयार केला जाईल. यासंदर्भात महापालिका प्रशासनाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. काँग्रेसने जनतेपुढे ठेवलेला जाहीरनामाही प्रशासनाकडे दिला आहे. ती कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील कचरा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्याची गरज आहे.
आजघडीला तांत्रिक अडचणीमुळे हा विषय प्रलंबित असला तरी तो लवकरच सोडविला जाईल. महापालिकेची परिस्थिती बिकट असली तरीही तिजोरीत खडखडाट नाही. फक्त आर्थिक नियोजनाची गरज असल्याचे खा. चव्हाण म्हणाले. महापालिकेचे आर्थिक स्त्रोत बळकट करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचाही आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहर हद्दवाढीच्या विषयात नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. मात्र शाश्वत विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. यासाठी त्या त्या भागातील नागरिकांचे तसेच माध्यमांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढीतून मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावरही काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले.