'आता आमचे जमतेय, विखे शिर्डीतून आठवलेंना मदत करतील'; रिपाइं लोकसभेसाठी आशावादी
By शांतीलाल गायकवाड | Published: May 25, 2023 12:22 PM2023-05-25T12:22:21+5:302023-05-25T12:23:14+5:30
शरद पवारांसोबत असताना विखे आमच्याशी काहीसे वेगळे वागले होते, आता मात्र ते आमच्या बाजूने आहेत, बाबूराव कदम
छत्रपती संभाजीनगर : जुने झाले गेले, आता आमचे जमतेय. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील रिपब्लिकन पार्टीचे शिर्डीतील लोकसभेचे उमेदवार, केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांना मदत करून विजयी करतील, असे मत रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी व्यक्त केले.
शिर्डीत येत्या २८ मे रोजी होणाऱ्या रिपाइं प्रदेश अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना बाबूराव कदम म्हणाले, शरद पवारांसोबत असताना विखे आमच्याशी काहीसे वेगळे वागले होते, आता मात्र ते आमच्या बाजूने आहेत. रिपाइं राज्यात लोकसभेच्या तीन जागा मागणार आहे. त्यातील एक शिर्डीची असून, तेथून रामदार आठवले उभे राहतील. उर्वरित दोन जागांमध्ये लातूर व मुंबईत एक जागेची आमची मागणी आहे. त्यासाठीच शिर्डीत आम्ही हे सतत दुसरे अधिवेशन घेत आहोत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याशिवाय पक्षाचे महासचिव अविनाश महातेकर, प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
राज्याच्या विस्तारात स्थान द्या
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातला असून, त्यात आम्हाला स्थान द्यावे, अशी मागणीही यावेळी कदम यांनी केली. पत्रकार परिषदेला दौलत खरात, किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, अरविंद अवसरमोल, दिलीप पाडमुख, विजय मगरे, मधुकर चव्हाण, ॲड. मनोज सरिन, लक्ष्मण हिवराळे आदींची उपस्थिती होती.