आता श्वानांच्या मोक्षप्राप्तीसाठी हवी शहरात स्मशानभूमी

By प्रशांत तेलवाडकर | Published: December 27, 2022 07:56 PM2022-12-27T19:56:45+5:302022-12-27T19:56:52+5:30

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोची मागणी, शहरात श्वानांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने भांडणे होत आहेत.

Now we need a cemetery in the city for the salvation of dogs | आता श्वानांच्या मोक्षप्राप्तीसाठी हवी शहरात स्मशानभूमी

आता श्वानांच्या मोक्षप्राप्तीसाठी हवी शहरात स्मशानभूमी

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात श्वान पालकांची संख्या वाढते आहे, तसेच दर महिन्याला ४०० पेक्षा अधिक श्वानांचा मृत्यू होतो. त्यांना कुठे न्यावे, असा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. श्वानांसाठी व इतर जनावरांसाठी शहरात सरकारी जागेत स्मशानभूमी तयार करावी, अशी मागणी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोने केली आहे.

२० हजार लोकांकडे श्वान
डॉ. अनिल भादेकर यांनी सांगितले की, आजघडीला शहरात सुमारे २० हजार लोकांनी श्वान घरात पाळले आहेत. काही जण असे आहेत की, त्यांच्याकडे एकपेक्षा अधिक श्वान आहेत. यात विदेशी जातीच्या श्वानांचा समावेश ७० टक्क्यांपर्यंत आहे.

४० हजार भटके श्वान
शहरात भटके श्वान किती आहेत, याचे सर्वेक्षण झालेच नाही. सुमारे ४० हजारांच्या जवळपास भटके श्वान आहेत. त्यात बहुतांश देशी जातीच्या श्वानांचा समावेश आहे. त्यांना कोणीच वाली नाही, असा दावा त्यांनी केला.

दर महिन्याला ४०० श्वानांचा मृत्यू
शहरात पाळीव व भटके श्वान मिळून ६० हजारांच्या जवळपास श्वान असावेत. दर महिन्याला यातील ४०० च्या जवळपास श्वानांचा मृत्यू होत असतो. त्यांच्यासाठी स्मशानभूमीची अत्यंत आवश्यकता आहे.

विद्युतदाहिनी तयार करावी
श्वानांच्या स्मशानभूमीकरिता जिल्हा प्रशासनाने सरकारी जागा उपलब्ध करून द्यावी. तेथे विद्युतदाहिनीची व्यवस्था करावी. जेणेकरून श्वानांची योग्यरीतीने विल्हेवाट लावता येईल. पाळलेले श्वान म्हणजे कुटुंबातील एक सदस्य असतो. त्या श्वानाचे निधन झाल्यास त्या कुटुंबास दु:ख होते. त्या श्वानांचा अंत्यविधी व्यवस्थित व्हावा, अशी त्यांची अपेक्षा असते. पाळीव असो वा भटक्या श्वानांसाठी स्मशानभूमीत विद्युतदाहिनीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोच्या अध्यक्षा आरती पाटणकर यांनी केली.

श्वानांच्या अंत्यसंस्कारावरून होताहेत भांडणे
डॉ. भादेकर यांनी सांगितले की, शहरात श्वानांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने भांडणे होत आहेत. एका डॉक्टरांच्या घरातील श्वानाचे निधन झाले. त्यांनी सोसायटीतील रिकाम्या जागेत श्वानाला पुरण्यासाठी खड्डा खाणण्यास सुरुवात केली. तेव्हा सोसायटीतील लोकांनी विरोध केला. हे भांडण नंतर माजी नगरसेवकापर्यंत जाऊन पोहोचले. श्वानाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, हे श्वानप्रेमींना कळत नाही. मनपाच्या कचरा गाडीतूनच श्वानांना नेले जाते.

Web Title: Now we need a cemetery in the city for the salvation of dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.