आता काय नुसते खाद्यतेल प्यायचे का ! खाद्यतेलाची फोडणी स्वस्त; डाळी महाग
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 8, 2023 07:48 PM2023-04-08T19:48:25+5:302023-04-08T19:48:37+5:30
डाळींनाही अवकाळी पावसाचा फटका बसला. परिणामी तूर डाळीपासून ते मसूर डाळीपर्यंत सर्वांचे भाव किलोामागे २ ते १० रुपयांपर्यंत वाढले.
छत्रपती संभाजीनगर : मागील दोन वर्षांत पहिल्यांदा करडी तेलाचे भाव लिटरमागे १० रुपयांनी कमी झाले. अन् तीन महिन्यांत अन्य खाद्येतलांचे भाव २५ रुपयांपर्यंत घटले. पण याच वेळी डाळींचे भाव मात्र वधारले आहेत. आता काय नुसते खाद्यतेलच प्यायचे का, असा सवाल ग्राहक विचारत आहेत.
मागील दोन वर्षे करडीचे उत्पादन कमालीचे घटले होते. यामुळे एरवी १०० ते १२० रुपये लिटर दरम्यान विक्री होणारे करडी तेल चक्क २२५ रुपये लिटरपर्यंत जाऊन पोहोचले होते. करडी तेल आरोग्यासाठी लाभदायक असल्याने ग्राहकांना ते खरेदी करावेच लागले. दरवर्षी वसंतपंचमीपासून करडीची आवक होते मात्र यंदा महिनाभर उशिरा आवक सुरू झाली. आता करडी बी ची आवक हळूहळू बाजारात वाढत आहे. महाराष्ट्रा शिवाय कर्नाटक व आंध्र प्रदेशातून करडी बी आणली जाते. आधी ५४०० रुपये क्विंटल करडी बी विकत ते आजघडीला ४६०० रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहे. परिणामी किरकोळ विक्रीत करडी तेल लिटरमागे १० रुपयांनी कमी होऊन २१० ते २१५ रुपये विकत आहे. परिणामी मागील आठवड्यात सर्व तेलांचे भाव लिटरमागे ५ रुपयांनी कमी झाले. मागील वर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल, पामतेलाच्या आयातीवर परिणाम झाला होता. यामुळे सूर्यफूल तेल १९० रुपयांपर्यंत गेले होते. हा आजपर्यंतचा भावाढीचा विक्रम ठरला होता. पण आता खाद्यतेलाची आयात सुरळीत असल्याने गेल्या तीन महिन्यांत ५० रुपये भाव लिटरमागे कमी झाले. अन्य खाद्यतेलांचे भावही २० ते २५ रुपयांनी घटले.
डाळीच्या दरात वाढ का?
मागील वर्षी हंगामात हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली होती. त्यातच पावसामुळे उत्पादनात घट झाली. अन्य डाळींनाही अवकाळी पावसाचा फटका बसला. परिणामी तूर डाळीपासून ते मसूर डाळीपर्यंत सर्वांचे भाव किलोामागे २ ते १० रुपयांपर्यंत वाढले. नवीन मुगाची चाहूल लागली असून जर पाऊस पडला नाही तर मुगाचे उत्पादन चांगले होईल, असे व्यापारी श्रीकांत खटोड यांनी सांगितले.
करडी तेलाचे भाव आणखी घटतील
महाराष्ट्रात करडी बीची आवक उशिरा का होईना सुरुवात झाली. आता कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आवक वाढली की करडी तेलाचे भाव आणखी लिटरमागे १० रुपये कमी होतील.
- जगन्नाथ बसैये, खाद्यतेल व्यापारी
भाव उतरणे अपेक्षीत होते
खाद्यतेलाचे भाव कमी झाले पण डाळींचे भाव वाढले आहेत. डाळींचे भाव कमी झाले असते तर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असता. पण ठीक आहे. खाद्यतेलाचे भावही खूप वाढले होते.
- सायली जोशी, गृहिणी
खाद्यतेलाच्या किमतीतील फरक (प्रतिलिटर)
प्रकार ३१ मार्च ७ एप्रिल
करडी तेल २२५ रु. २१५
शेंगदाणा तेल १८५ रु. १८० रु
सूर्यफूल तेल १४५ रु. १४० रु
सोयाबीन तेल १२० रु. ११५ रु
सरकी तेल १२५ रु. १२० रु
पाम तेल ११० रु. १०५ रु
तीळ तेल २०५ रु. २०० रु
डाळीतील किमतीतील फरक (प्रतिकिलो)
प्रकार ३१ मार्च ७ एप्रिल
तूर डाळ ११० रु. १२०रु
हरभरा डाळ ६४ रु. ६८ रु
मूग डाळ १०० रु. ११२ रु
उडीद डाळ ९४ रु. १०२ रु
मसूर डाळ ९० रु. ९२ रु