आता मालधक्क्यावर दोन फेऱ्यांमध्ये काम
By Admin | Published: June 17, 2014 12:13 AM2014-06-17T00:13:06+5:302014-06-17T01:15:18+5:30
जालना : येथील रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर रॅकमधून खताचा माल उतरविण्यास लागणाऱ्या विलंबाचा प्रश्न जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या मध्यस्थीमुळे निकाली निघाला आहे
जालना : येथील रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर रॅकमधून खताचा माल उतरविण्यास लागणाऱ्या विलंबाचा प्रश्न जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या मध्यस्थीमुळे निकाली निघाला आहे. अतिरिक्त कामगारांची नोंदणी करून दोन फेऱ्यांमध्ये कामगारांकडून काम करवून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. मालधक्क्यावर सद्यस्थितीत सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत कामकाज चालते. कामगार केवळ याच वेळेत माल उतरवितात. रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे रॅक आल्यापासून ९ तासात माल उतरणे आवश्यक आहे. त्यापुढे प्रतितास १० हजार रुपये डेमरेज दर आकारले जातात. रेल्वे रॅक दुपारपर्यंत आल्यास माल उतरविण्यास दुसरा दिवस उजाडला जातो. परिणामी, मोठ्या प्रमाणात डेमरेजची रक्कम वाहतूक प्रतिनिधींना भरावी लागते. या अडचणीचा फटका खरीप हंगामात खताचा माल उतरविण्यास होत असे. माल विलंबाने उतरला आणि त्यास डेमरेज द्यावा लागल्यास खताचा माल शेवटपर्यंत निर्धारित किमतीत पोहोचत नव्हता. मात्र जिल्हाधिकारी नायक यांनी कामगार निरीक्षकांना अतिरिक्त कामगार नोंदणी करून खताचा माल उतरविण्याचे काम सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते रात्री ११ अशा दोन फेऱ्यांमध्ये कामगारांनी काम करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
१३०० मे.टन खत आले
रेल्वे विभागाने रॅकपॉईन्टवरील डेमरेजचे दर १ जूनपासून वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु माल उत्पादक कंपन्यांनी सर्वदूर बंद घोषित केल्याने तब्बल १३ दिवस जालना मालधक्क्यावरील वाहतूक बंद होती. परंतु डेमरेज दरवाढीच्या निर्णयास रेल्वे प्रशासनाने स्थगिती दिल्याने कंपन्यांनी बंद मागे घेतला. त्यामुळे १६ जून रोजी आरसीएफ खताचा १३०० मे.टन माल सोमवारी उतरविण्यात आला.
‘पेट्रोमॅक्स, लाईटची व्यवस्था करा’
रेल्वे मालधक्क्यावर खताचा माल भरताना कामगारांसाठी पेट्रोमॅक्स व प्लॅटफार्मवरील लाईटची सोय वाहतूक प्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाने करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खताचा पुढील रॅक येण्याअगोदर ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.