‘रासेयो’ मॉडेल देशभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:52 AM2018-06-04T00:52:51+5:302018-06-04T00:53:16+5:30
महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव उपक्रम आहे. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशभर राबविणार असल्याची घोषणा दिल्लीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक वीरेंद्र मिश्रा यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव उपक्रम आहे. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशभर राबविणार असल्याची घोषणा दिल्लीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक वीरेंद्र मिश्रा यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल कार्यालयातर्फे आयोजित ‘आव्हान-२०१८’ हे दहादिवसीय शिबीर २५ मे ते ३ जूनदरम्यान पार पडले. रविवारी या शिबिराचा समारोप विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, रासेयोचे राज्यसंपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके, एनडीआरएफचे निरीक्षक पुरुषोत्तमसिंग राणा, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. गोविंद कथलाकुट्टे, कुलसचिव डॉ. साधना पांडे आदी उपस्थित होते.
यावेळी वीरेंद्र मिश्रा म्हणाले, राज्यपाल कार्यालयाने आयोजित केलेल्या या आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरात स्वयंसेवक प्रशिक्षण घेऊन जात आहेत. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होत आहे. देशाला सध्या कौशल्य विकासाचीच सर्वाधिक गरज आहे. हे कौशल्य विकासाचे मॉडेल देशभर घेऊन जाणार आहे. या मॉडेलचीच पाहणी करण्यासाठी दिल्लीहून येथे आलो आहे.
रासेयोची १९६९ साली सुरुवात झाली. तेव्हा ४० हजार स्वयंसेवक होते. आता हाच आकडा ४१ लाखांवर पोहोचला आहे. एवढी मोठी युवाशक्ती रासेयोकडे उपलब्ध असून, महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शिबीर घेत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अतुल साळुंके, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, पुरुषोत्तमसिंग राणा, किशोर शितोळे यांच्यासह स्वयंसेवक, संघप्रमुखांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केला. प्रास्ताविक डॉ. टी. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी मानले.