एनएसयूआयकडून जामियातील अत्याचाराचा निषेध; पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राच्या फलकाला फासले काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 05:07 PM2019-12-16T17:07:29+5:302019-12-16T17:13:48+5:30
जामियातील विद्यार्थ्यांवरील अमानुष अत्याचाराचे पडसाद औरंगाबादेत
औरंगाबादः दिल्लीतील जामियातील विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष अत्याचार हा संघप्रणित भाजपचा डाव असल्याचा आरोप करत एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राच्या फलकाला काळे फासले. तसेच विद्यापीठातील इतर विद्यार्थी संघटनांनी आज विद्यापीठ बंदची हाक दिली.
दिल्ली येथील जामिया मिल्लिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद औरंगाबादेतही उमटले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही एसएफआय, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठ बंद पुकारला. दरम्यान, जामियातील विद्यार्थ्यांवर झालेला अत्याचार हा संघप्रणित भाजपचा डाव असल्याचा आरोप करत एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राच्या फलकाला काळे फासले. या आंदोलनात एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, कार्याध्यक्ष देव राजळे विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहादूरे, प्रसिद्धी प्रमुख अजय भुजबळ आदींचा सहभाग होता.