नाभिक महामंडळाची जागा परस्पर विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:05 AM2021-07-20T04:05:46+5:302021-07-20T04:05:46+5:30
वैजापूर : नगरपालिकेच्या हद्दितील नाभिक महामंडळाची जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून संस्थेच्या पैशाचा अपहार व फसवणूक केल्याची तक्रार ...
वैजापूर : नगरपालिकेच्या हद्दितील नाभिक महामंडळाची जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून संस्थेच्या पैशाचा अपहार व फसवणूक केल्याची तक्रार नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार महामंडळाचे तालुकाध्यक्ष नसतानाही संतोष भीमराज गायके यांनी गणेश दाजिबा अनर्थे, शिवाजी कारभारी अनर्थे व सतीश अरविंद अनर्थे (सर्व रा. वैजापूर) यांच्याशी संगनमत करून महामंडळाचा नगरपालिका हद्दीतील सर्व्हे क्रमांक २७१/२/१ मधील प्लॉट क्रमांक ६२ ज्ञानेश्वर कचरू साठे (रा. जांबरगाव) यांना नोटरीद्वारे व गणेश दाजिबा अनर्थे यांना रजिस्ट्री (खरेदीखत) द्वारे विक्री केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात गायके यांनी नोटरी बयाना रक्कम ३० हजार रुपये व खरेदीखताची रक्कम २ लाख ५१ हजार रुपये घेऊन संस्थेच्या बँक खात्यात जमा केले नाही. नाभिक महामंडळाने १९९४ मध्ये वैजापूर नगरपालिकेच्या हद्दीत सर्व्हे क्र. २७१ मधील प्लॉट क्र. ६२ खरेदी (खरेदीखत क्रमांक ११५६२) केला होता. ही विश्वस्त महामंडळाची स्थावर मिळकत आहे. या जागेवर खासदार निधीतून हुतात्मा भाई कोतवाल सांस्कृतिक सभागृहासाठी पहिल्या हप्त्यापोटी २ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले होते, मात्र २००९ मध्ये महामंडळाच्या राज्य कार्यकारणीच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षपदाचा वाद निर्माण झाल्याने महामंडळात फूट पडून दोन गट निर्माण झाले. त्यामुळे गायके यांच्याकडे कुठलाही अधिकार नसताना व संस्थेचा ठराव नसताना जागेची विक्री करून बेकायदा कृत्य केले आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर आहेर व प्रांत सरचिटणिस दिलीप अनर्थे, विष्णू वखरे, बाबासाहेब जगताप, रंजितसिंह मथुरिया, संजय वाघ, दिलीप विश्वासू यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.