सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला हजारपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 06:59 PM2020-12-01T18:59:55+5:302020-12-01T19:01:45+5:30
corona virus in Aurangabad जिल्हाभरात दररोज शंभर ते सव्वाशे रूग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक संख्या ही शहरातील रूग्णांची आहे.
औरंगाबाद : दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये दररोज किंचित स्वरूपाची वाढ होत आहे. सध्या शहरात सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारापर्यंत पोहोचली आहे. पाच महिन्यांपूर्वी हा आकडा सहा हजारापर्यंत गेला होता. दिवाळीत बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे परिणाम शहरातही दिसून येतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. दिवाळी होऊन १३ दिवस उलटले मात्र कोरोनाची लाट दिसून आलेली नाही. मागील आठवडाभरापासून कोरोना रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत ही वाढ अत्यंत नगण्य स्वरूपाची आहे.
जिल्हाभरात दररोज शंभर ते सव्वाशे रूग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक संख्या ही शहरातील रूग्णांची आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबविण्यावर भर दिला आहे. पालिकेने शहरात विमानतळ, रेल्वेस्टेशनवर दिल्लीसह इतर शहरांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. त्यातून रोजचे दोन- चार प्रवाशी पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे बाहेरून येणारे कोरोना रूग्ण वेळीच शोधले जात असून त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये हलविले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास बरीच मदत होत आहे.
जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मार्गांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणीसाठी पथके तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेकडून प्राप्त अहवालानुसार शहरात सध्या ९३६ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ७४६ रूग्ण हे शहरातील आहेत. तर १६९ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहे. २१ रूग्ण औरंगाबाद बाहेरचे असून ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.