जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट,पण ऑक्सिजनची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:02 AM2021-05-11T04:02:27+5:302021-05-11T04:02:27+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. परंतु, सध्या गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय अन्य जिल्ह्यांतून शहरात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढतच आहे. परिणामी, ऑक्सिजनची मागणी कमी होण्याऐवजी वाढली आहे. रोज तब्बल ६१ टन ऑक्सिजन लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यंत्रणेची चांगलीच धावपळ होत आहे.
कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. परंतु, जिल्ह्यात आजघडीला ४१४ पैकी एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही. आयसीयू, ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यात वाढच होत असल्याची स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी ५५ ते ६० टन रोज ऑक्सिजन लागत होते. आजघडीला रोज ६१ टन ऑक्सिजन लागत आहे. त्यातही खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन वापर अधिक होतो आहे. ऑक्सिजनसाठी खासगी रुग्णालयांना धावाधाव करण्याची वेळ येत आहे. घाटीतही रोज ऑक्सिजनचे टँकर येत आहे. यात एकही दिवस खंड पडणार नाही, यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.
--
सक्रिय रुग्ण
- शहरात - १९८८ रुग्ण
- ग्रामीण भागात- ६,०८२ रुग्ण
----
जिल्ह्यात असा लागतो रोज ऑक्सिजन
- खासगी रुग्णालयांत -३४.७८ टन
- शासकीय रुग्णालयांत- २७.०३ टन
-------
वाढीव मागणी केली
सध्या रोज जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन लागत आहे, तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. पण, आपल्याकडे इतर जिल्ह्यांतील रुग्णही उपचारांसाठी दाखल होत आहेेत. रोज ६१ टन ऑक्सिजन लागत आहे. वाढीव ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे.
- संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)