स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नंबर, औरंगाबादेत दरवर्षी १० हजार नागरिकांचा मृत्यू! 

By मुजीब देवणीकर | Published: February 20, 2023 03:57 PM2023-02-20T15:57:33+5:302023-02-20T15:58:43+5:30

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शेडसह वाढवा ही मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

Number for cremation in the cemetery, 10 thousand citizens die in Aurangabad every year! | स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नंबर, औरंगाबादेत दरवर्षी १० हजार नागरिकांचा मृत्यू! 

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नंबर, औरंगाबादेत दरवर्षी १० हजार नागरिकांचा मृत्यू! 

googlenewsNext

- मुजीब देवणीकर
औरंगाबाद :
शहरात दरवर्षी जवळपास दहा हजार नागरिकांचा मृत्यू होतो. कोरोनाकाळात म्हणजेच २०२१ मध्ये मृत्यूने विक्रमच केला. तब्बल १२ हजारांहून अधिक नागरिकांच्या मृत्यूची नोंद महापालिका दप्तरी आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. तेव्हापासून आजपर्यंत काही स्मशानभूमींमध्ये नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागते.

ऐतिहासिक औरंगाबाद शहर चारही दिशेने झपाट्याने वाढत आहे. हर्सूल, पडेगाव, पैठण रोड, सातारा-देवळाई, चिकलठाणा, जटवाडा रोड आदी भागात नागरी वसाहतींचा विस्तार होत आहे. रोजगारासाठी ग्रामीण भागातील बेरोजगार मोठ्या संख्येने दररोज दाखल होतात. एकीकडे लोकसंख्या वाढत असताना स्मशानभूमी, कब्रस्तानची संख्या आहे तेवढीच आहे. शहरात ४२ स्मशानभूमी, तर ४२ कब्रस्तान आहेत. सातारा-देवळाई भागात दोन स्मशानभूमी आहेत, मात्र, तेथे पुरेशा सोयीसुविधा नाहीत, म्हणून अनेक नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी प्रतापनगर स्मशानभूमी गाठतात. नारेगाव भागात कब्रस्तान नाही, म्हणून एका संघटनेने ‘जनाजा मोर्चा’चे आयोजन केले. प्रशासनाने आश्वासन देऊन मोर्चा थांबविला. पडेगाव भागातही कब्रस्तानचा प्रश्न भेडसावतोय. कैलासनगर, मुकुंदवाडी, एन-६, प्रतापनगर, पुष्पनगरी, एन-११ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागतात. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शेडसह वाढवा ही मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

अनेकदा पाठपुरावा केला
मुकुंदवाडी स्मशानभूमीत अनेकदा अंत्यसंस्कारासाठी रांगा लागतात. या ठिकाणी अंत्यसंस्काराचे शेड वाढवावेत अशी मागणी अनेकदा प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र, त्यांची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही.
- भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक

स्मार्ट सिटीची योजना बारगळली
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील ९ अत्यंत महत्त्वाच्या स्मशानभूमी अद्ययावत करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला होता. स्मार्ट सिटी संचालक बोर्डाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. ९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. नंतर ही योजना गुंडाळण्यात आली.

मृत्यूच्या आकडेवारीतील चढउतार
वर्षे- पुरुष- महिला-एकूण

२०१८-५७८८-३८५२-९६४०
२०१९-५४२८-३६७२-९१००
२०२०-४३७५-२४८१-६८५६
२०२१-८०९५-४८६०-१२९५५
२०२२-५५०२-३२२५-८७२७

Web Title: Number for cremation in the cemetery, 10 thousand citizens die in Aurangabad every year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.