हज यात्रेकरूंची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:22 AM2018-07-09T01:22:30+5:302018-07-09T01:22:52+5:30
यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील १४ वर्षांपासून शहरातील चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून दरवर्षी तीन हजारांहून अधिक हज यात्रेकरू थेट जेद्दाह येथे रवाना होत होते. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. औरंगाबादहून हज यात्रेला जायचे असल्यास एका यात्रेकरूला ३० ते ३५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. केंद्राच्या या नवीन नीतीमुळे यात्रेकरूंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
हज यात्रा-२०१८ मध्ये मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यांतील यात्रेकरूंची संख्या जवळपास तीन हजारांहून अधिक आहे. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंची सबसिडी बंद केली असली तरी हज यात्रेकरूंच्या संख्येत किंचितही फरक पडलेला नाही. सबसिडी प्रत्येक हज यात्रेकरूंसाठी गौण होती. मात्र, सोयी-सुविधा चांगल्या मिळाव्यात एवढीच रास्त अपेक्षा यात्रेकरूंकडून आहे. मराठवाड्यातील यात्रेकरूंना पूर्वी हज यात्रेला जायचे म्हटले तर मुंबई गाठावी लागत होती. दोन यात्रेकरूंसोबत किमान १५ जण मुंबईला जात असत. तेथे राहाणे, ये-जा याचा खर्च २५ ते ३० हजार रुपये सहजपणे येत होता. यात्रेकरूंची ही मोठी अडचण लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री राजेंद्र दर्डा यांनी २००५ मध्ये थेट औरंगाबादहून जेद्दाह अशी विमानसेवा सुरू केली. या सेवेचा लाभ तब्बल १४ वर्षे यात्रेकरू घेत होते. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेसाठी प्रचंड नियमात फेरबदल केले. औरंगाबाद विमानतळावरून थेट जेद्दाह येथे जायचे असल्यास ३० ते ३५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत होते. त्यामुळे असंख्य यात्रेकरूंनी मुंबईहून जाणे पसंत केले. औरंगाबाद विमानतळावरून फक्त ५४० यात्रेकरू जाणार आहेत. २९ जुलैपासून यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना होणार आहे. तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. दररोज २०० यात्रेकरू रवाना होतील.