होम आयसोलेशनची संख्या वाढतेय; रुग्णालयात जागा नाही, २५०० रुग्णांवर घरीच उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 06:50 PM2021-03-23T18:50:10+5:302021-03-23T18:54:59+5:30
The number of home isolations is increasing in Aurangabad शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपलब्ध सरकारी व खासगी रुग्णालयांतील बेड्स अपुरे पडत आहेत.
औरंगाबाद : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची चाैकशी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने १० शिक्षकांची टीम कामाला लावली आहे. महापालिकेच्या कोविड वॉरमध्ये ही टीम कार्यरत असून, दररोज होम आयसोलेशनमधील रुग्णांशी फोनवर संपर्क केला जात आहे. एका रुग्णाच्या आरोग्याची सतत १० दिवस या टीमकडून माहिती घेतली जाणार आहे.
शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपलब्ध सरकारी व खासगी रुग्णालयांतील बेड्स अपुरे पडत आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या आणि अतिशय सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये घरीच उपचार दिले जात आहेत. यासाठी रुग्णाच्या फॅमिली डॉक्टरांकडून किंवा तो राहत असलेल्या संबंधित परिसरातील त्यांच्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र रुग्णाला पालिकेकडे सादर करावे लागते. त्यानंतर संबंधित डॉक्टरकडूनच या रुग्णांना आवश्यक औषधे व उपचार दिले जातात, तसेच त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे का, याविषयी रोजची विचारपूस पालिकेच्या यंत्रणेकडून केली जाते.
पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले की, होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी पालिकेच्या कोविड वॉररूममध्ये १० शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या दहा शिक्षकांच्या टीमकडे होम आयसोलेशन रुग्णांचा मोबाइल क्रमांकासह डाटा दिलेला आहे. त्यानुसार रोज संबंधित रुग्णांशी संपर्क करून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. यात काही रुग्णांत गंभीर लक्षणे जाणवल्यास पालिकेचे पथक त्यांच्या घरी जाते. आवश्यकता भासल्यानंतरच संबंधित रुग्णास कोविड सेंटरमध्ये दाखल केेले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
होम आयसोलेशनचाही वाढतोय आकडा
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांचाही आकडा वाढत चालला आहे. रविवारच्या प्राप्त अहवालानुसार, शहरात तब्बल २,५०० रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.