छावणी गणेश महोत्सव ठरतोय नंबर वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:05 AM2017-09-01T01:05:36+5:302017-09-01T01:05:36+5:30
बहुरंगी व बहुढंगी कार्यक्रमांसह मैदानी स्पर्धा आणि आखीव-रेखीव आयोजनाने छावणी गणेश महासंघाचा ‘छावणी महोत्सव’ सर्वत्र गाजतो आहे. हा महोत्सव दररोज गर्दीचा नवीन विक्रम नोंदवितो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बहुरंगी व बहुढंगी कार्यक्रमांसह मैदानी स्पर्धा आणि आखीव-रेखीव आयोजनाने छावणी गणेश महासंघाचा ‘छावणी महोत्सव’ सर्वत्र गाजतो आहे. हा महोत्सव दररोज गर्दीचा नवीन विक्रम नोंदवितो आहे.
राजकारणविरहित संघटना व पदाधिकाºयांमध्ये वेगळे काही तरी करून दाखविण्याची जिद्द असेल तर काय घडू शकते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण छावणीचा महोत्सव ठरतो आहे. अवघ्या ५१ गणेश मंडळांचे नेतृत्व करणाºया छावणी गणेश महासंघाने यंदा उत्कृष्ट महोत्सव घेऊन जिल्ह्यातील अन्य गणेश महासंघासमोर आदर्श निर्माण केला आहे. २५ हजार स्क्वेअर फुटांचा डोम व ३० बाय ५० फुटांचे भव्य रंगमंच, एकाच वेळेस ५ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था, यावरून या महोत्सवाची भव्यदिव्यता लक्षात येते. सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाने या महोत्सवाला सुरुवात झाली. रतन गवळे यांचा आॅर्केस्ट्रा, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाने तर महोत्सवाची चर्चाच घडविली. हास्यकवी मिर्झा बेग, नीलेश चव्हाण, ध.सु. जाधव, अविनाश भारती यांनी सादर केलेल्या विडंबन कवितांनी सर्वांना हसवून-हसवून लोटपोट केले. बुधवारी सादर झालेल्या ‘बायांनो नवरे सांभाळा’ या विनोदी नाटकाने गर्दीचा विक्रम नोंदविला. एवढेच नव्हे तर मैदानात ‘गिल्ली दंडा’ स्पर्धा घेऊन जुन्या खेळांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. गुरुवारी मुले व मुुलींचा हॉकी सामनाही येथे रंगला. तसेच सायंकाळी ‘कुस्तीची दंगल’ पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. शनिवारी (दि.२) सांस्कृतिक कार्यक्रम, तर ३ तारखेला हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मागील ७ दिवसांत ‘जरा हटके’ सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव मूळ संकल्पनेकडे वळविला आहे.