रुग्णसंख्या वाढताच उघडली‘होम आयसोलेशन’ची दारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:05 AM2021-03-14T04:05:06+5:302021-03-14T04:05:06+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ, लक्षणे नसलेल्या रुग्णांनी भरलेल्या खाटा आणि गंभीर रुग्णांची खाटांसाठी होणारी ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ, लक्षणे नसलेल्या रुग्णांनी भरलेल्या खाटा आणि गंभीर रुग्णांची खाटांसाठी होणारी भटकंती, यामुळे महापालिकेला अवघ्या २१ दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय बदलावा लागला आणि होम आयसोलेशनची दारे पुन्हा रुग्णांसाठी उघडावी लागली. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्तांनी दिलेल्या ‘डोस’नंतर महापालिकेला होम आयसोलेशन सुरू करण्याची जाग आली.
महापालिकेने २० फेब्रुवारीपासून अचानक होम आयसोलेशनची सुविधा बंद करून रुग्णांना पालिकेच्या कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयांत दाखल होणे बंधनकारक केले. त्यानंतर रुग्णसंख्येत दररोज मोठी भर पडत गेली. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी कोविड सेंटर, रुग्णालयांच्या खाटा भरल्या. त्यामुळे गंभीर रुग्णांना खाटा मिळविण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकावे लागत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी १० मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यावेळी जिल्हा रुग्णालयात ९० टक्के रुग्णांना लक्षणे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा सुनील केंद्रेकर यांनी गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध राहण्यासाठी होम आयसोलेशनची सुविधा पुन्हा सुरु करण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानुसार ११ मार्चपासून महापालिकेने पुन्हा होम आयसोलेशन सुरू केले. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर म्हणाल्या, काही अटी, शर्तींवर होम आयसोलेशनला पुन्हा परवानगी दिली जात आहे. पूर्वी रुग्ण कमी होते. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी होम आयसोलेशन बंद केले होते.
होम आयसोलेशन आधी का बंद केले?
एकाच कुटुंबातील चार ते पाच सदस्य कोरोनाबाधित म्हणून दाखल होत आहे. एकाच घरात इतके रुग्ण असल्यावर नियमांचे पालन होत नाही. संपर्कदेखील वाढतो. त्यामुळे होम आयसोलेशन बंद केले होते.
होम आयसोलेशन आता का सुरू केले?
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना खाटा उपलब्ध रहाव्या, यासाठी होम आयसोलेशन सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
-----
७८७ वरून ४ हजारांवर रुग्ण
जिल्ह्यात २० फेब्रुवारी रोजी सक्रिय म्हणजे उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या केवळ ७८७ होती. याच दिवसापासून होम आयसोलेशन बंद करण्यात आले होते. अवघ्या २१ दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ४६४ झाली. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरच्या खाटा भरण्यासाठी आधी होम आयसोलेशन बंद केले आणि आता खाटा भरताच होम आयसोलेशन पुन्हा सुरू केले, अशी ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.