औरंगाबादेत ‘सारी’ रुग्णांची संख्या सव्वादोन हजारांवर; ७५६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:14 PM2020-11-28T16:14:50+5:302020-11-28T16:19:01+5:30
शहरात मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर सारीने सुरूवातीला थैमान घातले होते.
औरंगाबाद : कोरोनासोबतच सारी या आजारानेही शहर त्रस्त आहे. या आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असल्यानेही आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. आजवर औरंगाबादेत आढळलेल्या सारी बाधितांची संख्या आता सव्वादोन हजारांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, सारी बाधितांच्या केलेल्या कोरोना चाचण्यांतून आजवर ७५६ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
शहरात मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर सारीने सुरूवातीला थैमान घातले होते. प्रारंभी सारीच्या रूग्णांचीच संख्या कोरोना रूग्णांच्या तुलनेत अधिक होते. मात्र सारी हा संसर्गजन्य आजार नसल्याने त्याचे रूग्णवाढीचे प्रमाण संथ राहिले, तर कोरोनाने शहराला विळखा घालत गंभीर परिस्थिती मध्यंतरी निर्माण केली होती. सारीची लक्षणे ही कोरोनासारखीच असल्याने राज्य सरकारने सारी आजारावरही लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या. त्यानुसार पालिकेने प्रत्येक सारीच्या रूग्णांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रत्येक खासगी रूग्णालयांना रोज आढळलेल्या सारीच्या रूग्णांची माहिती कळविण्याची सूचना केली. त्यानुसार नियमित सारीच्या रूग्णांचा अहवाल पालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त होत आहे. अपवाद वगळता आजपर्यंत सातत्याने सारीचे रूग्ण शहरात आढळून येत आहेत.
पालिकेकडून प्राप्त अहवालानुसार मंगळवारी शहरात सारीचे नव्याने दोन रूग्ण आढळले. त्यांची कोरोना टेस्ट केली असता दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. आजपर्यंत एकूण बाधितांपैकी १७ जणांना सारी आजारामुळे मृत्यू झाला. आजवर शहरात सारीचे एकूण २,२५३ रूग्ण आढळले. पैकी २,२४४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून आजवर ७५६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर १३९२ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.