थॅलेसीमियाग्रस्तांची संख्या सातशेच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:27 PM2019-05-07T23:27:16+5:302019-05-07T23:27:26+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातशेच्या घरात गेली आहे. पती-पत्नी मायनर आजाराने ग्रस्त असतील तर जन्मणाऱ्या बालकास थॅलेसीमिया मेजर आजार होण्याचा धोका वाढतो.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातशेच्या घरात गेली आहे. पती-पत्नी मायनर आजाराने ग्रस्त असतील तर जन्मणाऱ्या बालकास थॅलेसीमिया मेजर आजार होण्याचा धोका वाढतो. यासंदर्भात जनजागृतीची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
थॅलेसीमियाविषयी समाजात आजही फारशी जनजागृती नाही. या आजारासंदर्भात जनजागृती होण्यासाठी जगभरात दरवर्षी ८ मे रोजी थॅलेसीमिया दिन पाळण्यात येतो. या आजाराचे ‘मेजर’ आणि ‘मायनर’ असे दोन प्रकार आहेत. ‘मायनर’मध्ये आजाराची कोणतीही गंभीर परिस्थिती नसते.
रुग्णाला काही त्रासदेखील होत नाही. त्यामुळे अनेकदा ‘मायनर’ आजाराच्या रुग्णांचे निदानदेखील होत नाही; परंतु पती आणि पत्नी हे दोघेही ‘मायनर’ असल्यास त्यांच्यापासून जन्मणारे बालक हे थॅलेसीमिया मेजर असण्याचा सर्वाधिक धोका असतो. ‘थॅलेसीमिया मेजर’ या प्रकारात रुग्णांत लाल रक्तपेशींची निर्मिती होत नाही. त्यामुळे अशा बालकांना आयुष्यभर दर पंधरा अथवा दर महिन्याला रक्त देण्याची वेळ येते. त्यामुळे रुग्णांना आधार मिळतो. मात्र, वारंवार रक्त दिल्याने अन्य परिणामांनाही तोंड द्यावे लागते. वारंवार रक्त दिल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. त्यातून हृदय, यकृत आणि इतर अवयवांवर दुष्परिणाम होतो. त्यावर वेगळा उपचार घेण्याची वेळ येते. त्यातून आर्थिक संकटला तोंड द्यावे लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
दररोज १० ते १२ रुग्ण
घाटीत थॅलेसीमियाच्या २५० रुग्णांवर उपचार करण्यात येतात. रुग्णांना दर तीन आठवड्याला रक्त द्यावे लागते. त्यासाठी दररोज किमान १० ते १२ रुग्ण येतात. घाटीत थॅलेसीमिया डे केअरदेखील आहे. हा आनुवंशिक आजार आहे. दोन थॅलेसीमिया मायनर लोकांनी विवाह करू नये.
-डॉ. प्रभा खैरे, विभागप्रमुख, बालरोग, घाटी
सेंटरद्वारे उपचार
जिल्हा सामान्य रुग्णालयात सप्टेंबर २०१८ मध्ये डे केअर सेंटर सुरू केले. तेव्हापासून या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. याठिकाणी १४५ रुग्णांची नोंदणी झालेली आहे.
- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
लोहाचे प्रमाण वाढते
थॅलेसीमियाच्या रुग्णांचे हिमोग्लोबिन स्थिर राहत नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला रक्त द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात साधारण ६५० रुग्ण आहेत. वारंवार रक्त दिल्याने लोहाचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदय, यकृतावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज गोळ्या घेण्याची वेळ रुग्णांवर ओढावते.
- कैलास औचरमल, अध्यक्ष, औरंगाबाद थॅलेसीमिया सोसायटी