रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:58 PM2021-07-31T18:58:48+5:302021-07-31T19:00:49+5:30

अगदी काही अंतरावर रेल्वेस्टेशन असूनही मुकुंदवाडी, सिडको, चिकलठाणा भागातील हजारो नागरिकांना १५ किलोमीटर अंतरावरील मुख्य रेल्वेस्टेशन गाठावे लागत आहे.

The number of trains has increased, but the number of stops has not increased! Time to leave the nearest station and reach the main railway station | रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ

रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ

googlenewsNext
ठळक मुद्दे रेल्वेगाड्यांना थांबे देण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो.

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वेची स्थिती पूर्वपदावर येत आहे. औरंगाबादहून धावणाऱ्या रेल्वेंची संख्याही आता वाढली आहे. मात्र, रेल्वेचे थांबे काही केल्या वाढत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची कसरत प्रवाशांना करावी लागत आहे.

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनला ‘डी’ दर्जा मिळाला. त्यामुळे येथे सोयीसुविधा वाढविण्यात आल्या. या ठिकाणी रेल्वे आरक्षण तिकीट देण्याची सुविधाही देण्यात आली आहे, मात्र, आजघडीला याठिकाणी दोनच रेल्वे थांबतात. अन्य रेल्वे थांबण्याची वर्षानुवर्षे प्रतीक्षाच करावी लागत आहे. अगदी काही अंतरावर रेल्वेस्टेशन असूनही मुकुंदवाडी, सिडको, चिकलठाणा भागातील हजारो नागरिकांना १५ किलोमीटर अंतरावरील मुख्य रेल्वेस्टेशन गाठावे लागत आहे. नांदेड विभागासह दक्षिण मध्य रेल्वे विभागात अनेक ठिकाणी दोन रेल्वे स्टेशनमध्ये अंतर कमी असतानाही, त्या ठिकाणी एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा दिलेला आहे. तरीही मुकुंदवाडी स्टेशनवर जनशताब्दी, तपोवन यासारख्या एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा मिळत नसल्याची स्थिती आहे.
लासूर स्टेशन, रोटेगाव येथील प्रवाशांना जनशताब्दी, सचखंड एक्स्प्रेससाठी औरंगाबाद रेल्वेस्टेशन गाठावे लागते. या दोन्ही ठिकाणी या रेल्वे थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोषकुमार सोमाणी, नमो रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गौतम नाहाट, राजकुमार सोमाणी यांनी केली आहे.

याठिकाणी कधी थांबणार रेल्वे ?
- शहरातील चिकलठाणा स्टेशनवर आजघडीला रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वे थांबते. तर मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर फक्त औरंगाबाद- हैदराबाद आणि मराठवाडा एक्स्प्रेस थांबते. याठिकाणी अन्य एक्स्प्रेस थांबविण्याची मागणी आहे.
- मुकुंदवाडी स्टेशनवर प्रामुख्याने जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम एक्स्प्रेस थांबविण्याची मागणी प्रवाशांतून हाेत आहे. लासूर स्टेशन, रोटेगाव येथे नरसापूर-नगरसोल आणि जनशताब्दी, सचखंड एक्स्प्रेस थांबविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

वरिष्ठ पातळीवर निर्णय
मुकुंदवाडी स्टेशनवर दोन, तर चिकलठाणा स्टेशनवर एक रेल्वे सध्या थांबते. रेल्वेगाड्यांना थांबे देण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. त्यामुळे यासंदर्भात अधिक माहिती देता येणार नाही, असे रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेंना थांबा द्यावा
घरापासून अगदी काही अंतरावर मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन आहे. परंतु तेथे दोनच रेल्वे थांबतात. त्यामुळे मुख्य रेल्वेस्टेशनवर जावे लागते. याठिकाणी अन्य एक्स्प्रेस रेल्वेंनाही थांबा दिला पाहिजे.
- देवराज खिल्लारे, प्रवासी

फक्त आश्वासने
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर तपोवन एक्स्प्रेस थांबविली जाईल, असे आश्वासन दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिले होते. परंतु, अजूनही त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. जनशताब्दी, नंदिग्राम एक्स्प्रेसलाही येथे थांबा मिळाला पाहिजे.
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

सध्या सुरू असलेल्या रेल्वे
- सचखंड एक्स्प्रेस
- नंदीग्राम एक्स्प्रेस
- देवगिरी एक्स्प्रेस
- जनशताब्दी एक्स्प्रेस
- तपोवन एक्स्प्रेस
- अजंता एक्स्प्रेस
- रेणीगुंठा एक्स्प्रेस
- मराठवाडा एक्स्प्रेस

Web Title: The number of trains has increased, but the number of stops has not increased! Time to leave the nearest station and reach the main railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.